होतकरू महिलांसह युवतींना मिळाले रोजगाराचे दालन

0
11

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

संसाराचा गाडा चालविणाऱ्या घरातील कर्त्या पुरुषाच्या मदतीला आपणही आलो पाहिजे, असे अनेक स्त्रियांना वाटते. मात्र, शिक्षणाचा अभाव म्हणा वा उंबरठा ओलांडून बाहेर निघण्याची परवानगी नसल्याने अनेकींच्या मनात ही खंत राहत आली आहे. असे कष्ट घेण्याची तयारी असलेल्या होतकरू महिलांसह युवतींना रोजगाराचे दालन सामाजिक कार्यकर्त्या इंजि. कोमल सचिन तायडे यांनी कापड पिशवी उद्योगाच्या माध्यमातून देत आहे.

मलकापूर, नांदुरा, खामगाव आदी भागात घरोघरी शिलाई मशिनचे काम करणाऱ्या कष्टकरी महिलांना एस.के.स्केअर इंटरप्राईजेसच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या इंजि. कोमल तायडे ह्या शासनमान्य कापड देऊन त्यांच्याकडून पिशव्या शिवून घेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहेत. त्यांच्या उपक्रमात असंख्य महिला जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे महिलांना स्वाभिमानाने रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

अनेक महिलांच्या हातांना मिळाले काम

प्लास्टिकच्या पिशव्यांद्वारे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी शासनमान्य कापडाच्या माध्यमातून पिशव्या तयार करण्याचे काम इंजि. कोमल तायडे यांच्या माध्यमातून होत आहे. महाराष्ट्रभर त्याचे वितरण करण्यात येत आहे. अगदी अल्पावधीतच अनेक महिला व युवतींना एस.के.स्केअर इंटरप्राईजेस त्यांच्या माध्यमातून हाताला काम मिळाले आहे. त्यांच्या उपक्रमामुळे महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होत आहे, एवढे मात्र खरे.

इंजि. कोमल तायडे यांच्या माध्यमातून आम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. माझ्या कुटुंबासह अनेक निराधार महिला व घरी राहून काम करू इच्छिणाऱ्या महिलांना शिलाई कामाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे आम्हाला आमचे घर सांभाळून घरी बसून रोजगार मिळत आहे. त्याचा मनस्वी आनंद आहे.

– शारदा विजय वानखेडे
रा.हिंगणे गव्हाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here