लातूर :
लातूरमध्ये एका शेतकऱ्याला लिफ्ट घेणे जीवावर बेतलं आहे. भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने एकजण ठार व तीन जखमी झाले आहेत. लातूर जिल्ह्यातील लामजना पाटी जवळील पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.
लातूर जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याला लिफ्ट घेणे जीवावर बेतले आहे. शेताकडून घरी परतण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट घेऊन निघालेल्या तरुणाचे अपघाती निधन झाले आहे. निलंगा – औसा रोडवरील लामजना पाटीजवळ हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीला पाठीमागून कारने जोरदार धडक दिली. त्या धडकेत दुचाकी ४० ते ५० फुट लांब फरपटत गेली. या भीषण अपघातात लिफ्ट घेणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर कारमधील दोन आणि दुचाकीवरील एक जण असे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
शिवकुमार कांबळे असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. शिवकुमार कांबळे हा निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील रहिवासी आहे. शिवकुमारच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर दुसरीकडे, अपघातानंतर जखमीला तात्काळ लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.