तापी तीर ते भीमा तीर आषाढी वारी पालखी सोहळ्याचे यंदाचे ३१६ वे वर्ष
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा हा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहाने हजारो वारकरी, भक्तांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. यंदा आषाढी वारीचे ६ जून रोजी प्रस्थान होणार आहे. आदिशक्ती संत मुक्ताई मूळ मंदिर कोथळी ज्या ठिकाणी संत मुक्ताई ७२८ वर्षांपूर्वी अंतर्धान पावल्या, तेथून दरवर्षी हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी संत मुक्ताईच्या चांदीच्या पादुका पंढरपूर येथे जात असतात. यंदाचे आषाढी वारीचे ३१६ वे वर्ष आहे.
कोथळी येथील संत मुक्ताईच्या मूळ मंदिरातून शुक्रवारी, ६ जून रोजी दुपारी ३ वाजता प्रस्थान होणार आहे. पंढरपूर येथे गुरुवारी, ३ जुलै रोजी पंढरपूर येथे पालखी दाखल होणार आहे. पालखी सोहळ्यात हजारो वारकरी, महिला, पुरुष, भाविक भक्त सहभागी होतात. सहाशे किलोमीटर अंतर चालून ६ जिल्ह्यामधून पालखी सोहळ्याचा प्रवास असतो. जुने मंदिर कोथळी येथून प्रस्थान होऊन फुलांनी सजविलेल्या रथात संत मुक्ताईच्या चांदीच्या पादुका मुक्ताईनगर शहरातून तीन कि.मी.अंतर चालत मुक्ताईनगर येथील नवीन मंदिरातून मिरवणूक काढली जाते. यावेळी शहरात रांगोळीने रस्त्यावर सजावट करून पालखीचे स्वागत केले जाते. नवीन मुक्ताई मंदिरात पालखी सोहळा पोहोचल्यानंतर त्याठिकाणी पालखीचा पहिला मुक्काम होतो.त्यानंतर पालखी पुढे प्रवासासाठी मार्गस्थ होते. पालखी सोहळ्याला भीमा तीर ते तापी तीर असेही म्हटले जाते. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मुक्ताई संस्थानतर्फे दिंड्यांची नोंदणी सुरू आहे.
पालखी सोहळ्याच्या रथाला ओढण्यासाठी बैल जोडी राजेश पाटील, नाचणखेडा यांची असणार आहे. पालखी सोहळ्यासोबत दोन अश्व असणार आहे. ते अश्व संदीप रामचंद्र भुसे, मरकळ, ता.खेड, जि.पुणे यांचे असणार आहे. आषाढी वारी पालखीसोबत पोलिसांचा बंदोबस्त तसेच आरोग्य पथक रुग्णवाहिकेसहित तैनात असेल. तसेच पाण्याचे चार टँकर पालखी सोबत असतील. वारकरी व भाविक यांच्यासाठी फिरते स्वच्छालये पालखी सोहळ्यासोबत असतील.
पालखी सोहळ्यात दोन हजार वारकरी सहभागी होणार आहे. तसेच शेकडो दिंड्या पालखी सोबत व काही पालखी मार्गात सहभागी होणार आहे. ३ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचल्यावर संत नामदेव महाराज आजेगुरू वसंत मुक्ताई पालखी सोहळा भेट आणि विसावा दुपारी चार वाजता होईल. संत मुक्ताई पादुकांचे चंद्रभागा स्नान व पंढरपूर प्रवेश मुक्ताई मठ दत्ता घाट याठिकाणी होणार आहे. ५ जुलै रोजी संत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या संतांचा पालखी सोहळा भेटी व वाखरी निघणे सकाळी ११ वाजता होणार आहे.
६ जून ते ३ जुलैपर्यंत २८ दिवस पालखी सोहळ्याच्या पालखीचा रात्री मुक्काम असलेल्या गावांमध्ये मराठा मंगल कार्यालय मलकापूर, मोताळा, बुलढाणा, येळगाव, चिखली भरोसा फाटा, देऊळगाव मही, देऊळगाव राजा, कन्हैया नगर जालना, काजळा फाटा, अंबड, वडीगोद्री, गेवराई, पाडळसिंगी, नामलगाव फाटा, बीड माळवेस हनुमान मंदिर, बीड बालाजी मंदिर, पाली, वानगाव फाटा, पारगाव, वाकवड, भूम, जवळा, शेंद्री, माढा, आष्टी, पंढरपूर आदींचा समावेश आहे.
पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन
पालखी सोहळ्यासोबत वारकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी आणि दिंड्यांची नोंदणी करण्यासाठी संत मुक्ताई नवीन मंदिर व जुने मंदिर कोथळी याठिकाणी संपर्क साधावा. ६ जून रोजी प्रस्थान करणाऱ्या पालखी सोहळ्यावेळी वारकरी, महिला, पुरुष, सर्व मुक्ताई फडावरील कीर्तनकार, वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी सहभागी व्हावे, असे आवाहन संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.रवींद्र हरणे महाराज यांनी केले आहे.