आषाढी वारी पालखी सोहळा : संत मुक्ताई पालखी सोहळ्याची शुक्रवारी मंत्रालयात बैठक

0
21

साईमत, संदीप जोगी, मुक्ताईनगर :

श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा २०२४ हा पालखी सोहळा मंगळवारी, १८ जून रोजी दुपारी १ वाजता मूळ मंदिर कोथळी येथून प्रस्थान करणार आहे. आदिशक्ती संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळ्याचे यंदाचे ३१५ वे वर्ष आहे. या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी व मंदिराचे व्यवस्थापक पालखी सोहळा प्रमुख यांच्या उपस्थितीत १२ जून रोजी सायंकाळी जुने मुक्ताई मंदिर कोथळी येथे झाला. यासंदर्भात शुक्रवारी, १४ जून रोजी आषाढी वारीला जाणाऱ्या प्रमुख सात पालखी सोहळा प्रमुखांसोबत मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत सायंकाळी चार वाजता व पुणे येथे सकाळी ११ वाजता पालकमंत्री व आयुक्त यांच्यासोबत बैठक आयोजित केलेली आहे. यावर्षी प्रथमच नऊ किलो वजनाच्या चांदी असलेल्या पादुका प्रथमच पालखी सोहळा रथासोबत पंढरपूरला असणार आहे. लोकसहभागातून तयार झालेल्या चांदीच्या पादुकांचे पूजन व समर्पण सोहळा सोमवारी, १७ जून रोजी जुने कोथळी मंदिरात होणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे यांनी सांगितले.

पालखी सोहळ्याचे ज्या पद्धतीने मंदिर प्रशासनाकडून मागणी केली आहे. त्या मागणीच्या आधारे नियोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जुने मुक्ताई मंदिर कोथळी याठिकाणी जाऊन पाहणी केली. पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांच्यासोबत चर्चा केली. पाहणी दौऱ्यावेळी जळगाव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, ह.भ.प. उद्धव महाराज जुनारे, पोलीस उपविभागीय अधिकारी आर.एम.शिंदे, नायब तहसीलदार निकेतन वाळे, गटविकास अधिकारी निशा जाधव, वीज महावितरणचे अभियंता ज्ञानेश्‍वर ढोले तसेच आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. १३ रोजी सकाळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी श्रीमती वेवोटोलो केजो यांनी मुक्ताई मंदिर येथे पाहणी करीत व्यवस्थापक ह.भ.प. उद्धव महाराज यांच्याशी चर्चा केली.

पालखी सोहळ्यासाठी अशा आहेत प्रमुख मागण्या

शासनाकडून फिरते स्वच्छालय (मोबाईल टॉयलेट) उपलब्ध करून देण्यात यावे, वारकऱ्यांसाठी दोन ते तीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात, वारकऱ्यांसाठी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था करण्यात यावी, भजनी मंडळांना साहित्य देण्यात यावे, एक शासकीय अधिकारी समन्वयासाठी पालखी सोहळ्या सोबत असावा. पालखी सोहळ्या संदर्भात १४ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे सोबत सायंकाळी ४ वाजता मुंबई येथे व सकाळी ११ वाजता पुणे येथे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, पुणे आयुक्त यांच्यासोबत पालखी सोहळा प्रमुखांची बैठक आयोजित केली आहे.

प्रथमच नऊ किलो वजनाच्या चांदीच्या पादुका

खान्देशचे वैभव व आराध्य दैवत असलेल्या श्री संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये आता मोठे बदल व परिवर्तन झालेले आहे. पूर्वी पालखी खांद्यावर घेऊन जात होते. त्यावेळेस पितळी पालखी व पादुका होत्या. नंतर बैलगाडीतून पादुका व रथ घेऊन जात होते. यावर्षी प्रथमच लोकसभागातून नऊ अंदाजे नऊ किलो वजनाच्या चांदीच्या पादुका पालखी सोहळा रथासोबत पंढरपूरला असणार आहे. तसेच चोपदाराची काठी चांदीची असणार आहे. आता प्रत्येकाला आषाढी वारीचे वेध लागले आहे. मानाची व सन्मानाची पालखीला ३१५ वर्षाचा प्रदीर्घ काळ होत आहे. सहा जिल्ह्यातून पालखीचा प्रवास आहे. १८ जून रोजी जुने मंदिर ते नवीन मंदिरापर्यंत प्रत्येकाने वारीत प्रस्थानाच्या वेळी सहभागी व्हावे, असे आवाहन पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र हरणे महाराज यांनी केलेले आहे.

शासनाकडून दोन कोटीचा निधी

पंढरपूर येथे आषाढी एकादशी वारीला जात असलेल्या मानाच्या सात पालखी सोहळ्याला राज्य शासनाकडून पालखी सोहळ्यामध्ये निधीची तरतूद केलेली आहे. श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती मूळ मुक्ताई मंदिर कोथळी येथील व्यवस्थापक ह.भ.प. उद्धव महाराज जुनारे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here