अधीक्षिकेवर गंभीर आरोप, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील आशादीप शासकीय महिला वस्तीगृहात एका गतिमंद मुलीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वस्तीगृहात तैनात असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर तब्बल सात दिवसांनी हे प्रकरण उघडकीस आले. किरकोळ वादातून वस्तीगृहातीलच एका मुलीने गतिमंद मुलीला मारहाण केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दरम्यान, अशा सर्व प्रकारामुळे सध्या आशादीप वस्तीगृह वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच याप्रकरणी संबंधितांनी चौकशीला कसून सुरूवात केली आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रफिक तडवी यांनी तात्काळ चौकशी समिती नेमली. चौकशीत वस्तीगृहाच्या अधीक्षिका सोनिया देशमुख यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातला चौकशी अहवाल महिला व बालविकास आयुक्तांकडे सादर केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वस्तीगृहातील एक बांगलादेशी तरुणी अद्यापही फरार
यापूर्वी, एप्रिल महिन्यात आशादीप वस्तीगृहातून एक बांगलादेशी तरुणी फरार झाली आहे. मात्र, तिचा अद्यापही शोध लागलेला नाही. असे असतानाही वस्तीगृहातील आणखी एका तरुणीला बेकायदेशीरपणे दोन दिवस बाहेर राहण्याची परवानगी दिल्याचा आणि याबाबत अधीक्षिका सोनिया देशमुख यांनी जिल्हा महिला व बालविकास विभागाला कोणतीही माहिती दिली नसल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर होत आहे. तसेच वस्तीगृहात दाखल असलेल्या एका बलात्कार पीडित तरुणीचे नाव उघड केल्याचा ठपकाही सोनिया देशमुख यांच्यावर ठेवण्यात आला आहे.