रा.काँ.च्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांनी घेतली आक्रमक भूमिका
साईमत/चाळीसगाव /प्रतिनिधी
चाळीसगाव विधानसभा मतदार संघाची जागा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उबाठा गटाला सुटल्यानंतर त्याचे पडसाद गेल्या दोन दिवसांपासून चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात उमटत आहे. चाळीसगाव शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातील कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहे. त्या अनुषंगाने माजी आमदार राजीवदादा देशमुख यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, ज्येष्ठ नेते प्रदीपदादा देशमुख, सतीश दराडे, किसनराव जोर्वेकर, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांच्यासह रा.काँ.चे सर्व नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना व्यक्त होतांना दिसून आल्या. तालुकाभरात उबाठा गटाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका ग्रामीण भागातील विकास सोसाट्या यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्राबल्य नसलेल्या उबाठा गटाला ही जागा सुटली कशी? आणि तालुकाभरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा एकच पक्षच सुरूवातीपासून भाजपा विरोधातील प्रबल पक्ष आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सदस्य संख्याबळ हे भाजपासमोर तोडीसतोड असतांना विधानसभेची ही जागा उबाठा गटाला कशी जाते?
त्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरत संताप व्यक्त करीत जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळविण्यासाठी पक्षाकडे मागणी लावून धरावी नाही तर या जागेवर राजीवदादा देशमुख किंवा पद्मजा देशमुख यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करावा, अशी आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली असल्याचे चिंतन बैठकीत दिसून आले.
चाळीसगावची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच सोडण्याची मागणी
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी सांगितले की, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाची जागा उबाठा गटा सोडण्यात आल्याचे कळताच आम्ही तात्काळ मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत चाळीसगाव विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी, अशी आग्रही भूमिका मांडली चाळीसगावची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची हक्काची जागा असून ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच सोडण्यात यावी, अशी मागणी मुंबई येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत आम्ही लावून धरली असल्याचे सांगतिले. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत ही जागा तडजोडीतून उबाठा गटाला सोडण्यात आली असली तरी ही जागा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेससाठीच सोडली जाईल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चिंतन बैठकीत मांडली.
माजी आमदार राजीवदादा देशमुखांच्या भुमिकेकडे लागले लक्ष
विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप जाहीर झाले असले तरी काही जागांवर फेरबदल होणार असल्याचे उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी एक दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे. त्यात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचा नििश्चत समावेश केला जाईल , असे सांगितले असली तरी कार्यकर्ते मात्र उबाठा गटाला सुटलेली ही जागा कोणत्याही परिस्थितीत मान्य करायला तयार नाहीत. प्रचारात सहभागी होण्यास तयार नसल्याचे दिसून आले. त्यामुळे यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर माजी आमदार राजीवदादा देशमुख काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे.