चेन्नई ः वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या उटी या ठिकाणी असलेल्या चॉकलेट फॅक्टरीला भेट दिली. या चॉकलेट फॅक्टरीचे वैशिष्ट्य हे आहे की, या फॅक्टरीत सगळ्या महिलाच काम करतात. इथे काम कसं चालतं हे जेव्हा राहुल गांधी महिला कर्मचाऱ्यांकडून जाणून घेत होते त्याचवेळी तिथे एक लहान मुलगी आहे. तिने राहुल गांधींना एक विनंती केली. ज्यानंतर राहुल गांधी यांनी केलेली कृती चर्चेत आहे. हा व्हिडीओही व्हायरल होतो आहे.
काय आहे व्हायरल व्हिडीओत?
राहुल गांधी महिला कर्मचाऱ्यांशी बोलत होते त्याचवेळी तिथे एक चिमुरडी मुलगी आली. तिने राहुल गांधींना विचारले, तुम्ही मला सही द्याल का? राहुल गांधींनी तिच्या वहीवर सही केली आणि त्यानंतर राहुल गांधी त्या मुलीला म्हणाले, आता तुला एक विनंती मी करतो.. ती म्हणाली काय? त्यावर राहुल गांधी म्हणाले, मला तुझी सही हवी आहे, देशील? ती मुलगी हसली आणि म्हणाली हो जरुर. मग राहुल गांधींनी तिची वही आणि तिचा पेन तिच्याकडे दिला आणि तिची सही घेतली.या गोष्टीनंतर ती लहान मुलगी खूपच आनंदी झाली. राहुल गांधींचा चॉकलेट फॅक्टरीतला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.