साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी
दि . मलकापूर अर्बन को . ऑप बँक लि . मलकापूरची आर्थिक स्थिती ढासळल्याचे लक्षात आल्याने रिझर्व्ह बँकेने २४ नोव्हेंबर २०२१ रोजी एका आदेशान्वये ६ महिन्यांसाठी निर्बंध जारी करीत ग्राहकांना त्यांच्या खात्यातून १० हजार रूपये काढता येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने काढलेल्या आदेशात व प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले होते . ६ महिन्याचा कालावधी झाल्यानंतर जून २०२२ मध्ये पुन्हा रिझर्व्ह बँकेने सदरचे निर्बंध ३ महिन्यांकरीता वाढविले होते .
या सर्व प्रक्रियेत मात्र त्याठिकाणी असलेले ठेवीदार नाहक भरडले जात आहे . त्यांच्या हक्काचा पैसा त्यांना वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अशा ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी आपण रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करण्याबरोबरच त्याठिकाणीही न्याय न मिळाल्यास न्यायालयात याप्रकरणी दाद मागणार असल्याची माहिती आ . राजेश एकडे यांनी दिली . दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे की , गेल्या काही वर्षामध्ये दि . मलकापूर अर्बन बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्याने रिझर्व्ह बँकेने काही महिन्यांपूर्वी बँकेचे ऑडीट व चौकशी करण्यात आली होती . यामध्ये बँकेची आर्थिक व्यवस्था ढासळल्याचे प्रथम दर्शनी लक्षात आल्याने रिझर्व्ह बँकेने या बँकेवर २४ नोव्हेंबर २०२१ रोजी सहा महिन्यांकरीता निर्बंध जारी केले होते.
यामध्ये बँकेतून पैसे काढण्यावर १० हजार रूपयांची मर्यादा घालून अनेक निर्बंध लादण्या बरोबरच बँकेच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही कर्जाचे नुतनीकरण करण्यात येवू नये , कोणतीही गुंतवणूक करू नये , कोणतेही दायीत्व घेवू नये व कोणतेही पेमेंट वितरीत करण्यात येवू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते . बँकेच्या ग्राहकांसाठी रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयापैकी एक म्हणजे त्यांना १० हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही .
बचत आणि चालू खाते अशा दोन्ही ग्राहकांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला होता . विशेष म्हणजे सर्व बचत बँक किंवा चालू खाती किंवा ठेवीदारांच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रक्कमेच्या १० हजारापेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी नसल्याचेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट नमूद केले होते . रिझर्व्ह बँकेने आणलेल्या या निर्बंधामुळे बँकेचे ठेवीदार भयंकर अडचणीत आलेले आहेत . याबाबत कोणीही समोर येवून बोलण्यास तयार नाही . ५ लाखा पर्यंत डिपॉझिटची हमी असल्याने ती फक्त कमी लोकांना मिळाली . त्यातच अजूनही बहुसंख्य खातेदार आहेत की त्यांना अद्यापपावेतो रक्कम मिळालेली नाही . यासाठी एक लोक प्रतिनिधी या नात्याने या ठेवीदारांच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्याय मिळावा याकरीता रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करणार आहे . ज्या ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे असलेले पैसे अद्यापपावेतो मिळालेले नाहीत त्यांनी आमच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करावा . त्यांना नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल .
मलकापूर अर्बन बँकेमध्ये ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी संदर्भात आपण रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करणार असून त्यानंतरही न्याय न मिळाल्यास याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याबाबत याचिका दाखल करून त्यांना न्याय मिळवून देण्याकरीता एक लोकप्रतिनिधी म्हणून ही सर्व प्रक्रिया करतांना खातेदारांना कुठलाही मोबदला किंवा खर्च दयावा लागणार नसून ही सर्व प्रक्रिया आमदार या नात्याने आपण करणार आहोत .