साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी
येथील भारतीय जैन संघटना व आनंद सुपर शॉपी यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदराज पॅलेस येथे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी हे होते. तर व्यासपीठावर महावीर पतसंस्थेचे चेअरमन प्रा. शांतीलाल बोथरा, जैन समाजाचे संघपती सुभाषचंद बरडिया, आनंद सुपर शॉपीचे संचालक व जैन दादावाडीचे संचालक डॉ. निर्मल टाटिया, भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ.सुरेश अलीझाड, चोपडा पीपल्स बँकेचे संचालक नेमीचंद कोचर, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष निर्मल बोरा व महिला अध्यक्ष सपना टाटिया आदींची उपस्थिती होती.
गुणांची कदर करा गुणांच्या सन्मान करा गुणवाल्यांना पुढे पाठवण्याचे समाजाने काम करावे जो गुणांच्या सन्मान करतो, त्यात संस्कृतीचे दर्शन होते असते, असे प्रतिपादन माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी भारतीय जैन संघटना व आनंद सुपर शॉपी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात अध्यक्षीय भाषणातून केले. ते पुढे म्हणाले की, शिक्षकाचा सत्कार समाजाने करायलाच हवा. पिढी घडविण्याचे काम हा शिक्षकच करतो. शिकविण्यात जो आनंद आहे तो आनंद कोणत्याच क्षेत्रात नाही. त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा चांगल्यात चांगले शिकवण्याकडे लक्ष द्यायला हवे. असे प्रतिपादन अरुणभाई गुजराथी यांनी केले. यावेळी व्यासपीठावरील डॉ.निर्मल टाटिया यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गुणांच्या मागे धावू नका. जनरल नॉलेजकडे लक्ष दया, समाजात कसे वावरावे? कसे बोलावे ? याकडे लक्ष द्या तसेच गुणांबाबत पालकांनी मुलांवर दबाव टाकू नये असा सल्ला डॉ. टाटिया यांनी यावेळी दिला.
तसेच प्रा. शांतीलाल बोथरा यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला मेहनत करणे व मेहनत करून सिद्ध करणे याकडे लक्ष द्यावे लागेल.आगामी काळात नोकर्या मिळतीलच यावर अवलंबून राहू नका. परंतु चांगले शिक्षण घ्या त्यामुळे जिवनात काहीही करू शकतो, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंगलाचरण महिला मंडळने केले. तदनंतर स्वागतगीत झाले. मान्यवरांचा सत्कार भारतीय जैन संघटनेचे गौरव कोचर, शुभम राखेचा, श्रेणिक रूनवाल, आकाश सांड, अभय ब्रम्हेचा आदी पदाधिकार्यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दहा आदर्श शिक्षकांचा स्मृतीचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती शिक्षकांचा परीचय अर्चना बोरा यांनी करून दिला. तसेच जवळपास ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन यावेळी गुणगौरव करण्यात आला. यावेळी लतिश जैन, जितेंद्र बोथरा यांच्या वाढिवसानिमित्त त्यांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, महावीर पतसंस्थेचे माजी संचालक डॉ.आर.टी्.जैन, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष धिरेंन्द्र जैन आदिंसह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दर्शन देशलहरा, चेतन टाटिया, उपाध्यक्ष मयंक बरडीया, दिनेश लोडाया, आनंद आचलिया, प्रवीण राखेचा, शुभम राखेचा, विपुल छाजेड आदींनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक राखेचा यांनी केले. सुत्रसंचालन मानसी राखेचा, मिनाक्षी जैन व अर्चना बोरा यांनी केले तर आभारप्रदर्शन आदेश बरडीया यांनी केले.