पत्रकार परिषदेत राज्यप्रमुख रामहरी राऊत यांची माहिती
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
राज्यातील प्रत्येक घटकासाठी सहज लाभदायी असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची कार्यपद्धती लोकांपर्यंत पोहचावी, या उद्देशाने आरोग्य वारी व आरोग्य संवाद यात्रेचे शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्यावतीने आयोजन केले असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष पवन सोनवणे यांनी मुक्ताईनगर येथे आ.चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाने रुग्णांच्या मदतीसाठी तीनशे कोटींहून अधिक अर्थसहाय्य वितरीत केला आहे. ना वशिला, ना ओळख थेट मदत मिळते. गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आशेचा किरण ठरलेला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क आहे.
दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना गेल्या दोन वर्षं एक महिन्यात ३०१ कोटी रुपये अर्थसहाय्य वितरीत केले आहे. ३६ हजाराहून अधिक गंभीर रुग्णांचे जीव वाचले आहेत. रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वतः थेट अर्ज करा आणि मदत यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवा आणि स्वतः अर्ज करा.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कक्षाची जबाबदारी दिली आहे. दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.
आ.चंद्रकांत पाटील रुग्णसेवक….
पत्रकार परिषदेप्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी भ्रमणध्वनीवरून बोलतांना मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील यांची रुग्णाविषयीची असलेली तळमळ सांगितली. दररोज त्यांचा मला फोन असतो. तसेच ते रुग्णांच्या मदतीला धावून जाणारे आमदार आहेत.त्यामुळे त्यांची एक रुग्णसेवक म्हणून ओळख आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता फंडातून ९८ लाखांची मदत आ.पाटील यांच्या माध्यमातून मिळालेली असल्याचे त्यांनी सांगितले.
यांची लाभली उपस्थिती
गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळावी, यासाठी आ.चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघासाठी आरोग्य संवाद यात्रेचे आयोजन केलेले आहे. आरोग्य संवाद यात्रेचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष छोटू भोई, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष पवन सोनवणे, जळगाव जिल्हा प्रमुख जितेंद्र गवळी, आमदार पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, वैद्यकीय कक्षाचे तालुकाप्रमुख विष्णू कोळी, वैद्यकीय सहाय्यक दीपक पाटील, सुमित हिरोळे, दीपक माळी, सोनू तायडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.