साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू.कॉलेजमध्ये प्राचार्य पी.एम.कोळी यांच्या आदेशान्वये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आर्मी स्कूलमध्ये बहुसंख्य विद्यार्थी हे शेतकऱ्याची मुले आहेत. त्यांनाही या सणाची आपसूकच ओढ असते. त्यामुळे त्यांना सणाचा आनंद घेता यावा, यासाठी नवलभाऊ कृषी महाविद्यालयाच्या मालकीची बैल जोडी आणून त्यांचे पूजन प्राचार्य व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बैलांना खाऊ-पिऊ घातले गेले. शिंगांना रंगरंगोटी करण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी बैल पळवून आनंद घेतला. खऱ्या अर्थाने सांस्कृतिक परंपरांची जोपासणूक या माध्यमातून आर्मी स्कूलमध्ये करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसोबत प्राचार्य पी.एम. कोळी, संतोष पवार, शिवाजी पाटील, श्री.साळुंखे, हेमंत मोरे, मिलिंद बोरसे आदी उपस्थित होते.