साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर
येथील गोंडगाव रस्त्यावरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण व स्टेशन भागातील रहिवासी राजश्री नितीन देशमुख यांच्या घरावर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकत सोन्या-चांदीसह रोकड मिळुन अंदाजे दहा लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबविला आहे. चव्हाण व देशमुख कुटूंबास दरोडेखोरांनी मारहाण करत चार ते पाच जणांना जखमी करत दहशत निर्माण केली. दीड वर्षाच्या बालकाच्या गळ्यास तलवार लावत चव्हाण यांच्याकडील ऐवज लांबविला. सात ते आठ दरोडेखोरांनी दहशत माजविल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस दाखल झाले होते. ‘शाम’ नामक श्वान पथकही दाखल झाले होते.
सविस्तर असे की, कजगाव येथील स्टेशन भागातील रहिवासी राजश्री नितीन देशमुख यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडत दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. त्यानंतर तलवार लोखंडी रॉडचा धाक दाखवत व मारहाण करत देशमुख यांना कपाट आणि अंगावरील सोने काढण्यास भाग पाडले. येथुन साडेसात तोळे सोने व एक लाख रुपये रोख दरोडेखोरांनी घेत तेथुन काही अंतरावरील बापु खोमणे यांच्या घराचा कडीकोंडा तोडण्यासाठी प्रयत्न सुरू असतांनाच बापु खोमणे यांना दरोडेखोर आले असल्याचा फोन आला. त्यामुळे ते जागे झाल्याने दरोडेखोरांनी तेथुन पळ काढला. दरोडेखोरांनी तेथुन काही अंतरावरील कजगाव-गोंडगाव मार्गावरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण यांच्या घराकडे आपला मोर्चा वळविला. याठिकाणी बाहेरच झोपलेले ओंकार चव्हाण यांना दरोडेखोरांनी जबर मारहाण करत घरात प्रवेश केला. एका रूममध्ये ताराबाई ओंकार चव्हाण झोपलेल्या होत्या. दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला करत तलवार रोखत अंगावरील चांदीचे कडे (गोट)एक किलो वजनाचे तसेच अंगावरील सोन्याची पोत कानातले असे अडीच तोळे सोने तसेच आरती समाधान चव्हाण यांचे अंगावरील अडीच तोळे सोनेसह ८५ हजार रुपये रोख असा चार ते पाच लाखाचा ऐवज दरोडेखोरांनी लांबविला. ताराबाई चव्हाण यांच्या कानातील बाळी चक्क कानाला जबर दुखापत करत नेली तर समाधान चव्हाण यांच्या लहान बाळाच्या गळ्यावर तलवार लावत दहशत निर्माण करत सारा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला. सोने, चांदी देण्यास प्रतिकार करत असल्याने दरोडेखोरांनी ओंकार चव्हाण (वय ६८) यांना दोघे पायावर मोठ्या प्रमाणावर तसेच ताराबाई चव्हाण यांच्या कानास व हातावर मोठी दुखापत केली. समाधान चव्हाण यांनाही दरोडेखोरांनी जबर मारहाण केली. याबाबत गावात फोन केल्यानंतर काही तरुण अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचले. मात्र, दरोडेखोरांनी तेथुन पळ काढला होता.
श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण
घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, फौजदार डोमाळे, पालकर, गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील, कजगाव पोलीस चौकीचे नरेंद्र विसपुते यांच्यासह भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण केले होते. श्वानाने देशमुख यांच्या घरापासून तर थेट चव्हाण यांच्या घरापर्यंत मार्ग दाखविला. पुढे चव्हाण यांच्या घरापासून बाजुलाच असलेल्या शेतापर्यंत मार्ग दाखविला. तेथेच तो घुटमळल्यामुळे दरोडेखोरांचा सुगावा लागु शकला नाही.
‘बुड्डी का हाथ तोड डालो’… म्हणत निर्माण केली दहशत
ताराबाई चव्हाण यांच्या हातातील चांदीचा एक कडा निघत नसल्याने ‘बुड्डी का हाथ तोड डालो’ असे करत दहशत निर्माण करत होते. एकाच रात्रीत दोन ठिकाणी दरोडेखोरांनी दरोडे टाकत मारहाण करत दहशत निर्माण केली. चोरट्यांमुळे घर मालक जागे झाल्याने एक घर फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. या घटनेमुळे गावातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
कजगाव पोलीस मदत केंद्र उरले केवळ ‘नावालाच’
कजगावला पोलीस मदत केंद्र असूनही मात्र ते केवळ ‘नावालाच’ उरले आहे. तेथे कायमस्वरूपी पोलिसच नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती डोकेवर काढत आहे. वास्तविक तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गावात सुरक्षा व्यवस्था ‘रामभरोसे’ आहे. अशा गंभीर बाबीची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन येथे कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी व्यापारी मंडळासह ग्रामस्थांनी केली आहे.