तानाजी सावंतांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार

0
4

पुणे : प्रतिनिधी

जिल्ह्यातील दोन आरोग्यप्रमुखांची एकाच दिवशी बदली केल्याने जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. पुणे महानगरपालिका आरोग्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान पवार आणि पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे यांची मंगळवारी बदली करण्यात आली आहे. एकाच वेळी दोन महत्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांची बदली झाल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

डॉ. भगवान पवार यांची सहाय्यक संचालक आरोग्य सेवा अंधत्व नियंत्रण कार्यक्रम या पदावर तर पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांची मुंबई येथील आरोग्य सेवा औद्योगिक विभागाचे सहाय्यक संचालक पदावर बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारचे अवर सचिव व.पां. गायकवाड यांनी काढले आहेत. पवार यांची पाच महिन्यातच तर हंकारे यांची अवघ्या तीनच महिन्यातच उचलबांगडी करण्यात आली आहे.

या दोन्ही अधिकाऱ्यांची नियुक्ती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मर्जी डावलून केल्याची चर्चा सुरूवातीपासूनच होती.अशात थेट आरोग्यमंत्र्यांचा हात डोक्यावर असल्याने या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप प्रशासनात दबक्या आवाजात सुरूच होता. याची तक्रार थेट मंत्रालयापर्यंत गेली होती. त्याचाच परिपाक म्हणून काहीच महिन्यांत या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे हंकारे आणि पवार यांच्या बदलीमागे पुण्यात लक्ष घातलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील हात असल्याचे बोलले जात आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची काहीच महिन्यात उचलबांगडी केल्याने हा मुख्यमंत्र्यांचा आरोग्यमंत्र्यांना जोर का झटका असल्याचे बोलले जात आहे.या बदल्यांचे आता राजकीय पडसाद कसे उमटतात हे पाहणे महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here