आश्रम शाळांच्या शिक्षकांसाठी रविवारी क्षमता परिक्षा

0
6

साईमत नंदुरबार प्रतिनिधी

आदिवासी विकास विभागातंर्गत कार्यरत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार व तळोदा यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांची क्षमता परीक्षा दि. १७ सप्टेंबर रविवार रोजी दुपारी 2:00 ते 3:30 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. सदरची माहिती, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की (तळोदा), प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार (नंदुरबार) यांनी पत्रकान्वये दिली आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धींगत व्हावे, त्यांना स्वयंअध्ययनाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वत:ची गुणवत्ता सिध्द करण्याची संधी मिळावी व विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व्हावी व विकसित व्हावी ह्या हेतूने शिक्षकांची क्षमता परीक्षा घेण्यात येत आहे. शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत कार्यरत 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शिखकांची एससीईआरटी, एनसीईआरटी या पाठ्यपुस्कातील अभ्यासक्रमावर आधारित क्षमता परिक्षा घेण्यात येणार आहे.
नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त शहादा, नवापूर व नंदुरबार या तीन तालुक्यातील 32 शासकीय आश्रमशाळा व 30 अनुदानित आश्रमशाळा मधील शिक्षकांची क्षमता परिक्षा शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नंदुरबार व एकलव्य मॉडेल स्कुल नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली आहे. तसेच तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त तालुक्यातील 42 शासकीय आश्रमशाळा व 21 अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांची क्षमता परिक्षा शासकीय आश्रमशाळा शिर्वे, दाब व तलाई या तीन परीक्षा केंद्रावर तालुका निहाय आयोजित करण्यात आली आहे.
प्रकल्प कार्यालय नंदुरबार व तळोदा अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षकांनी क्षमता परीक्षेस उपस्थित राहावे, असे आवाहन आदिवासी विकास विभाग आयुक्त श्रीमती नयना गुंडे, अपर आयुक्त नाशिक विभाग संदीप गोलाईत व प्रकल्प अधिकारी मंदार पत्की (तळोदा) चंद्रकांत पवार (नंदुरबार) यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here