साईमत, मुंबई : प्रतिनिधी
जळगावच्या चिंचोली कुसुंबा येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्यास मान्यता मिळावी यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची गुरूवारी मंत्रालयात भेट घेतली. त्यात जळगाव तालुक्यात चिंचोली – पिंपळे, कुसंबा येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभारण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून देत मंत्रालयस्तरावर प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगितले. यासाठी गुलाबराव पाटील यांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या मान्यतेमुळे चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्यास मान्यता दिल्याने रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच याबाबत शासन निर्णय निघणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ४ जानेवारी २०२२ रोजी झालेली आढावा बैठक, जळगाव उद्योग क्षेत्रातील विविध संघटनांनी जळगाव औद्योगिक क्षेत्रालागत नवीन जागा भूसंपादनाची मागणी करून तालुक्यात चिंचोली, कुसंबा येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहत स्थापन करण्यास मान्यता मिळावी म्हणुन मागणी केली होती. उद्योगमंत्री यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे प्रादेशिक अधिकारी धुळे यांनी महाव्यवस्थापक महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ मुख्यालय मुंबई यांना मौजे कुसुंबे खुर्द चिंचोली येथे औद्योगिक वसाहत स्थापन करणे बाबत प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार चिंचोली-पिंपळे व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्यास उद्योग मंत्री सामंतांची मान्यता मिळाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आभार मानले आहे. यामुळे रोजगार वाढीला संधी मिळणार आहे.