जिल्ह्यात ७५ गावांमधील २९६ जल पुनर्भरणाच्या कामांना मंजूरी
जळगाव ( प्रतिनिधी ) –
जिल्ह्यातील दिवसेंदिवस घटत चाललेली भूजल पातळी, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जल पुनर्भरणा करिता जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या मिशन संजीवनी उपक्रमांतर्गत जिल्ह्यात ७५ गावांमधील २९६ जल पुनर्भरणाच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे.
वाढते तापमान, वाढते काँक्रिटीकरण यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळी घटत आहे. भूजल पातळीत होणारी घट चिंतेचा विषय असून भीषण पाणीटंचाई ला तोंड द्यावे लागत आहे. भूजल पातळीत होणारी घट भरून काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेने मिशन संजीवनी अभियान सुरू केले आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत जिल्हाभरात जिल्हा परिषदेकडून होणाऱ्या विविध इमारत बांधकामांना जल पुनर्भरण बंधनकारक करण्यात आले आहे. जल पुनर्भरण केल्याशिवाय काम पूर्ण झाल्याचा दाखला व कंत्राटदाराचे देयक अदा करू नये असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
मिशन संजीवनी अभियान जळगाव जिल्ह्यात सुरू झाल्यानंतर आतापर्यंत ७५ गावात २९६ कामांना मान्यता देण्यात आली पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते जमिनीतच मुरवण्याचा हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात होणार आहे. अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, व यावल या तालुक्यातील प्रत्येकी ५ गावांमध्ये होत असलेल्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी जल पुनर्भरण करण्यात येणार आहे.