वैध अर्जांमध्ये १६ अपक्ष उमेदवारांचा समावेश, माघारीकडे लागले लक्ष
साईमत/जामनेर/प्रतिनिधी
जामनेर विधानसभा मतदार संघातून राजकीय पक्षांचे प्रमुख उमेदवार मंत्री गिरीष दत्तात्रय महाजन (भाजपा), जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप बळीराम खोडपे सर (महाविकास आघाडी), विशाल मोरे (बसपा), अण्णासाहेब रामचंद्र राठोड (हिंदू समाज पार्टी), प्रभाकर साळवे (राष्ट्रीय समाज पक्ष), मदन शंकर चव्हाण (भारतीय जनसम्राट पार्टी) यांच्यासह १६ अपक्ष उमेदवारांचे अर्ज बुधवारी, ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या छाननीत वैध ठरल्याचे विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना मोरे यांनी जाहीर केले आहे. मतदार संघातून २२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ते सर्व छाननीनंतर वैध ठरले आहेत.
येथील विधानसभा मतदारसंघात २६ उमेदवारांकडून ३४ उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. त्यात काही उमेदवारांनी दोन अर्ज खरेदी केले होते. बुधवारी अर्ज छाननीअंती २६ पैकी २२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारीची अंतीम मुदत आहे. ४ उमेदवारांपैकी डॉ.प्रशांत भिमराव पाटील यांनी भरलेल्या दोन अर्जांपैकी एक नाव ‘एबी’ फॉर्म दिलीप खोडपे यांच्या अर्जाला लागल्यामुळे यादीमधून कमी झाले आहे. तसेच डी. के.पाटील यांचेही नाव ‘एबी’ फॉर्म खोडपे सरांच्या अर्जाला लागल्यामुळे यादीमध्ये समाविष्ट नाही. दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज कागदपत्र अपूर्ण असल्याने बाद झाले आहेत. त्यामुळे आता २२ उमेदवार अद्याप रिंगणात आहेत.
माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार…!
येत्या ४ तारखेला उमेदवारी माघार घेण्याची शेवटची तारीख असल्याने त्याचदिवशी किती उमेदवार खरे रिंगणात राहतील, हे स्पष्ट होणार आहे. त्यात भराडी येथील एक अपक्ष उमेदवार दिलीप शांताराम खोडके नाव हे मतदारांना गोंधळ निर्माण करण्यासाठी घेण्यात आल्याने मतदार संघात एकच चर्चा सुरु होती.