साईमत, जामनेर : प्रतिनिधी
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग आणि इंडियन डेंटल असोसिएशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीच्या सभागृहात तंबाखु विरोधी दिन साजरा करण्यात आला. यावेळी तंबाखु जन्य पदार्थांचे सेवन न करण्याचे आरोग्य विभागातर्फे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य कर्मचारी, पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सुरुवातीला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ.आशिष महाजन यांनी तंबाखु व तंबाखु जन्य पदार्थांचे दुष्परिणाम याविषयी माहिती देऊन चित्रफीत दाखविली. तंबाखु जन्य पदार्थांच्या सेवनाने नाक, कान, घसा, तोंडाचा व फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे तंबाखु किंवा तंबाखु जन्य पदार्थाचे सेवन कुणी करीत असल्यास सेवन सोडण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले.
याप्रसंगी प्रा. सुधीर साठे, डॉ.प्रशांत सारताळे, डॉ.संदीप कुमावत, डॉ.भाग्यश्री बावसकर, डॉ.शारीक काद्री, डॉ.मोहिनी मोरे, आशा कुयटे, सलील पटेल, अतुल चिमकर, त्र्यंबक तंवर उपस्थित होते. सुत्रसंचालन रवींद्र सूर्यवंशी तर आभार डॉ.पल्लवी राऊत यांनी मानले.