साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कुल (सी.बी.एस.ई.) शाळेचा सातवा वार्षिक स्नेहसंमेलन ‘समर्पण’ नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ.अविनाश जोशी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शंभू पाटील (परिवर्तन सांस्कृतिक संस्था, जळगाव), शाळेचे मार्गदर्शक बजरंग अग्रवाल, चेअरमन डी.डी.पाटील, अध्यक्ष नीरज अग्रवाल, मुख्याध्यापक विनोद अमृतकर, शालेय समितीच्या सदस्या सितीका अग्रवाल, ममता अग्रवाल, आचल अग्रवाल उपस्थित होते. सुरुवातीला अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे नृत्य सादर करून सर्व पाहुण्यांचे आकर्षकरित्या स्वागत केले. वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा विशिष्ट सेवा पुरस्कार मान्यवरांना देण्यात आला. त्यात डॉ. निखिल बहुगुणे (आरोग्य), निरंजन पेंढारे (शिक्षण), दीपाली भोईटे (समाजसेवा) यांचा समावेश आहे. वार्षिक स्नेहसंमेलनात पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यावेळी वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आले. वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यात गुरु समर्पण, शिक्षणाचे महत्त्व, मातृ पितृ समर्पण, शिवाजी महाराज-राजमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयीचे समर्पण, अयोध्या येथे श्रीरामाचे आगमन, यावरील उत्कृष्ट असे नृत्य व नाटक कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. विविध कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुण्यांसहित उपस्थित पालक वर्ग भारावून गेले होते. यावेळी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे टाळ्या वाजवून भरभरून कौतुक केले होते.
यासाठी शालेय समितीच्या सदस्या सितीका अग्रवाल, मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या आणि शिक्षकांच्या अथक परिश्रम, मार्गदर्शनामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात शाळेचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे, पालक वर्ग, विद्यार्थी, शिक्षक सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थ्यांनीच केले. त्यात तिन्ही विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग होता. ‘राष्ट्रगान’ म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.