साईमत, यावल : प्रतिनिधी
येथील यावल नगरपरिषदेने गेल्या ९ जानेवारी २०२४ रोजी वार्षिक सर्वसाधारण निविदा प्रसिद्ध केल्याने ठेकेदारांच्या वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच मागील निविदांची मुदत आणि ठराव, आदेश, वर्कआर्डर यांची मुदत संपलेली नसताना निविदा प्रसिद्ध झाल्याने यावल नगरपरिषद कारभाराविषयी आणि ठेकेदारांच्या सोयीनुसार निविदा काढल्याने हे प्रकरण मुख्याधिकारी यांच्या अंगाशी येणार असल्याचे चर्चिले जात आहे.
यावल नगरपरिषदेचा १७ जानेवारी २०२० रोजी विशेष सभेतील ठराव क्रमांक ७१६ प्रत्यक्ष बघितला असता यावल नगरपरिषद हद्दीतील गट नंबर २६, ७५४ व ६८७ च्या ओपन स्पेसमध्ये विकसित केलेले बगीचे देखभालसाठी मागविण्यात आलेल्या वार्षिक ई-निविदेनुसार प्राप्त निविदांपैकी सर्वात कमीबाबत विचारविनिमय करण्यात आला. त्या कामाची वर्कऑर्डरही पाच वर्षासाठी देण्यात यावी, त्यासाठी येणाऱ्या खर्चास विशेष सभा मंजुरी देत आहे. खर्च विकास निधी किंवा नगरपरिषद निधीतून करण्यात यावा, असा सर्वानुमते ठराव मंजूर झाला होता. विशेष सभेतील ठरावाला सूचक म्हणून अतुल वसंतराव पाटील तर अनुमोदक म्हणून नौशाद मुबारक तडवी होते. परंतु ह्या कामाची मुदत संपण्याच्या आधीच वार्षिक सर्वसाधारण निविदा २०२४-२५ प्रथम वेळ यावल नगरपरिषद मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी काढल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या कामांसाठी संबंधित ठेकेदाराला अनुक्रमे दिनांक २९ मार्च २०२१, २६ सप्टेंबर २०२१, ३० मार्च २०२२, ३१ मार्च २०२२ आणि १९ जुलै २०२३ रोजी कार्यारंभ आदेश तसा वर्कऑर्डर दिलेली आहे. त्याची मुदत संपलेली नसताना निविदा काढल्याने ही काढलेली निविदा ही नवीन ठेकेदारांच्या हितासाठी आणि फायद्यासाठी काढली गेली का..? असा प्रश्न संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील ठेकेदारी वर्गात उपस्थित केला जात आहे. यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी ९ जानेवारी २०२४ रोजी काढलेली निविदा रद्द न केल्यास याबाबत कायदेशीर कारवाईला मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्यासह संबंधित विभागाला सामोरे जावे लागणार असल्याचे चर्चिले जात आहे.
बगीचा मेंटेनन्स कामाबाबतही भोंगळ कारभार
आरक्षण क्र.३३ मधील बगीचा मेंटेनन्स कामाबाबतही भोंगळ कारभार सुरू आहे. या बगीच्यामध्ये ज्या ठेकेदाराचा माणूस काम करीत आहे. त्या ठेकेदारासह त्या मजुराला यावल नगरपालिकेकडून पेमेंट न मिळता दुसऱ्याच ठेकेदाराला (अधिकृत वर्क ऑर्डर कार्यारंभ आदेश नसताना तसेच त्या ठेकेदाराचा माणूस काम करीत नसताना) पेमेंट दिले जात असल्याचीही माहिती समोर आली आहे. गंभीर प्रकरण जनतेसमोर येणार असल्याने यावल नगरपरिषद मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी मागील गेल्या ५ वर्षातील संबंधित कामांच्या कार्यारंभ, आदेश, वर्कऑर्डर यांची खात्री आणि पाहणी करून नंतरच वार्षिक सर्वसाधारण निविदा पुनश्च आणि ती सुद्धा ‘ई’ निविदा म्हणून प्रसिद्ध करावी, अशीही मागणी ठेकेदार वर्गातून होत आहे.



