नूतन कार्यकारिणी निवड करण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर, नागारोव जाधव यांचे ‘आदर्श विचार संग्रह-३’ चे प्रकाशन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
शहरातील शिवाजी नगरातील दा. शा. पाटील स्मृतीभवनात जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकती घेण्यात आली. पुढील काळात जिल्हा व राज्यभरात संस्थेचे नावलौकीक व्हावे म्हणून साहित्य चळवळ वाढीसाठी पुढील जबाबदारी तरुण पदाधिकाऱ्यांकडे देत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डी. डी. पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त केले. पुढील सुत्र नूतन कार्यकारिणीच्या हाती देणार असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डी. डी. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून डी. बी. पाटील, सुधाकर बी. चौधरी, प्रा.एस.आर. महाजन, प्रा. सौ.पी.एस. महाजन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कडुबा पाटील, सचिव गोरख सूर्यवंशी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पहुर पेठ येथील नागारोव जाधव बाबा यांचे ‘आदर्श विचार संग्रह-३’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
सभेत मंडळाचे सचिव गोरख सूर्यवंशी यांनी मनोगतात मंडळाची आजपर्यंतची पार्श्वभूमी मांडली. सदस्य विनोद जाधव यांनी १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अहवाल वाचन केले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. एस. आर. महाजन, विनोद माळी, विजय सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेत आगामी काळात विविध साहित्यिक कार्यक्रम, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कवी संमेलन घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन व उत्तेजन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. सभेच्या सुरूवातीला अहवाल वर्षात मागील वर्षाचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. तसेच अहवाल वर्षात खर्चास मंजूरी देण्यात आली. पुढील वर्षाच्या अंदाज पत्रकास मंजूर करण्यात आली.
विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय
याप्रसंगी नूतन कार्यकारिणीच्यावतीने सहसचिव जितेंद्र गोरे यांनी आगामी काळात नवोदितांसाठी विविध स्पर्धा व संमेलन घेऊन यथोचित सत्कार व व्यासपीठ उपलब्ध करून देत दरवर्षी सर्व नवोदित कवींचा प्रत्येकी एक कविता घेऊन साहित्य संमेलनप्रसंगी ‘कवितांचा संग्रह’ मंडळाच्यावतीने प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती दिली. जामनेरी बोली भाषेचे संवर्धन, कवी संमेलन, कथा संमेलन, विविध उपक्रम, साहित्यिकांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी खजिनदार सुकदेव महाजन, सहसचिव जितेंद्र गोरे, सदस्य रूपेश बिऱ्हाडे, विनोद माळी, अश्विन रोकडे, सैय्यद रशीद, दर्पण फोटोचे संचालक सुनील जाधव यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सहसचिव जितेंद्र गोरे, सुत्रसंचलन विनोद जाधव तर आभार विजय सूर्यवंशी यांनी मानले.