ॲनिमल ९०० कोटीच्या क्लबमध्ये एन्ट्री तर ‘डंकी’ ला ब्रेक

0
17

सध्याचा वातावरणात होणारा बदल बॉक्स ऑफिसवरही परिणाम दाखवत आहे. नवीन वर्षाची सुरुवात होताच तिकीट बारीवर येणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळाली. परिणामी शाहरुख खानचा ‘डंकी’ आणि प्रभासचा ‘सालार’ या दोन्ही चित्रपटांच्या कमाईत सातत्याने घट होतांना दिसत आहे.
रिलीजच्या १९ व्या दिवशी सोमवारी ‘डंकी’ देशात २ कोटींचा व्यवसायही करू शकला नाही. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची संख्या ११ टक्के होती. दुसरीकडे, रणबीर कपूरचा चित्रपट ‘ॲनिमल’ अजूनही ब्लॉकबस्टर आहे. सध्या या सिनेमाच्या शोमध्ये घट झाली असली तरी प्रेक्षकांची पसंती नक्कीच या सिनेमाला मिळत आहे. आता रिलीजच्या ३९व्या दिवशी या चित्रपटाने जगभरात ९०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘डंकी’ गेल्या वर्षी २१ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. सध्या बॉक्स ऑफिसवर प्रभासचा ‘सालार’ हे एकमेव मोठे आव्हान डंकीसमोर होते परंतु दुर्दैवाने या दोन्ही चित्रपटांच्या कमाईत सातत्याने घट होत आहे. sacnilk च्या अहवालानुसार, ‘डंकीने’ सोमवारी, १९ व्या दिवशी देशात केवळ १.५० कोटी रुपयांची कमाई केली. अशाप्रकारे चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता २१८.१७ कोटी रुपये झाले आहे.
‘डंकी’ चे बजेट १२० कोटी रुपये आहे. पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या, त्यामुळे तो देशातील २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करु शकेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह होते पण हळूहळू चित्रपटाने बजेटच्या दीडपट कमाई केली आहे.
सध्या बॉक्स ऑफिसवर ‘सालार’शिवाय दुसरा कोणताही मोठा चित्रपट नाही. साहजिकच अशा परिस्थितीत प्रेक्षकांकडेही पर्यायांचा अभाव असतो. २५ जानेवारीला हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा ‘फाइटर’ हा पुढचा मोठा रिलीज होणारा सिनेमा असेल. विजय सेतुपती आणि कतरिना कैफ यांचा ‘मेरी ख्रिसमस’ १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
‘डंकी’ची जगभरात ४२७ कोटींची कमाई
शाहरुख खान, तापसी पन्नू स्टारर ‘डंकी’ ने जगभरातील कलेक्शनच्या बाबतीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. या चित्रपटाने १९ दिवसांत जगभरात ४२७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. शाहरुखच्या आधीच्या दोन चित्रपटांसारखा तो ब्लॉकबस्टर ठरला नाही पण ‘सालार’ची बंपर ओपनिंग होऊनही हा सिनेमा तिकीट खिडकीवरच तग धरुन आहे.
‘फायटर’ रिलीज होईपर्यंत ‘डंकी ‘ भारतीय बॉक्स ऑफिसवर संथगतीने कमाई करत राहील, असा अंदाज आहे. शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने देशात २२७ कोटींची कमाई केली होती तर सलमानच्या ‘किक’ने २३३ कोटींची कमाई केली होती. ‘डंकी ‘ची आयुष्यभराची कमाई या चित्रपटांना मागे टाकते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
तर दुसरीकडे रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ देशात सातत्याने लाखोंची कमाई करत आहे. त्यामुळे अनेक थिएटर्सनी ‘ॲनिमल’चे शोदेखील वाढवले आहेत. असे असूनही ‘ॲनिमल’ने सोमवारी रिलीजच्या ३९व्या दिवशी ३५ लाख रुपयांचे कलेक्शन केले आहे.अशा प्रकारे, चित्रपटाने देशात ५५०.८५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे, तर जगभरातील ९०० कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन पार केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here