राजकीय पक्षाच्या उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार
साईमत/यावल/प्रतिनिधी :
रावेर तालुक्यात सावदा कुलसुमबाई सभागृहात प्रहार जनशक्तीतर्फे आयोजित आशा सेविका, अंगणवाडी सेविकांचा मेळावा नुकताच पार पडला. यावेळी रावेर विधानसभा मतदारसंघासाठी प्रहार जन शक्ती पक्षाचे प्रमुख आ.बच्चू कडू यांनी अनिल चौधरी यांची उमेदवारी जाहीर केली. यावेळी प्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू यांच्यासोबत उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल चौधरी, मान्यवर उपस्थित होते. यावेळी आ.बच्चू कडू यांनी समाजात असलेली आर्थिक असमानता दूर झाली पाहिजे, असे प्रतिपादन केले.
खासदार, आमदार प्राध्यापक, कलेक्टर यांना लाखो रुपये पगार तर ग्राउंड लेव्हलवर काम करणारे सर्व लोक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांना मात्र अतिशय कमी पगार ही आर्थिक विसंगती आहे. ती दूर करण्याचा प्रहार संघटना नेहमी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आमचे आज दोन आमदार असले तरी येत्या निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने उतरू. आमचे किमान २० ते २५ आमदार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, प्रहार कोणाबरोबर राहणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले की, अद्याप निर्णय घेतला नसल्याचे सांगत लवकरच सर्व सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे बोलत सर्व पर्याय खुले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रावेर विधानसभेसाठी अनिल चौधरी यांचे नाव आजच जाहीर करीत आहे. ते निश्चित असल्याचे सांगितले.
यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जळगाव जिल्हा सल्लागार शरद बारजिभे, यावल तालुकाध्यक्ष प्रवीण सोनवणे, यावल तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील, शहर प्रमुख उत्तम कानडे, सचिव अरुण ठाकूर, यावल तालुका संघटक ललित पाटील, तालुका संपर्क प्रमुख दिलीप आमोदकर, महिला आघाडी सल्लागार खुशबू चौधरी, राजेंद्र गीते, अशोक भावसार यांच्यासह दिव्यांग बांधव आणि भगिनी यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली.
मतदानाची आकडेवारी अन् वाढता जनसंपर्काचा विचार
रावेर विधानसभा मतदारसंघात आ.बच्चू कडू यांनी अनिल चौधरी यांची उमेदवारी निश्चित असल्याचे जाहीर केल्याने गेल्या निवडणुकीत त्यांनी मिळविलेल्या मतदानाची आकडेवारी आणि त्यांचा वाढता जनसंपर्क लक्षात घेता रावेर विधानसभा मतदार संघात निवडणूक रिंगणात येणाऱ्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांना चांगलीच राजकीय कसरत करावी लागणार असल्याचे संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात सर्व स्तरात चर्चिले जात आहे.