शासनाच्या दुर्लक्षाविरोधात धरणे आंदोलन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, या आंदोलनात शंभर टक्के सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या चार श्रम संहितांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत या संहिता कामगारविरोधी असल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केला आहे. कामगार व कर्मचारी हिताचे विद्यमान कायदे रद्द करून लागू करण्यात आलेल्या या श्रम संहिता तात्काळ रद्द कराव्यात, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या वेतन, सेवा-सुरक्षा व सन्मानाशी संबंधित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, यासाठी समन्वय समितीच्या वतीने देशव्यापी लाक्षणिक संपात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या मागण्यांच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री, महिला व बालविकास मंत्री, महिला व बालविकास विभागाचे सचिव तसेच नवी मुंबई येथील एबाविसे योजनेचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन व भत्ते लागू करावेत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी द्यावी, तसेच गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना २४,८०० रुपये व मदतनीसांना २०,४०० रुपये वेतन मंजूर करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता रद्द करून तो मानधनात समाविष्ट करावा, योजना कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा व मासिक पेन्शन लागू करावी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कामाचा थकीत मोबदला तात्काळ अदा करावा आणि योजनाबाह्य कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून करून घेऊ नयेत, अशा मागण्यांचाही समावेश आहे. दरवर्षी एक महिना उन्हाळी सुट्टी, भरपगारी आजार रजा, एफआरएसमधील तांत्रिक अडचणी दूर करणे तसेच पोषण ट्रॅकरसाठी ५जी मोबाईल व वार्षिक मोबाईल रिचार्ज भत्ता देण्याची मागणीही निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
देशव्यापी लाक्षणिक संपाच्या दिवशी अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी कोणतेही दैनंदिन काम न करता केंद्रे बंद ठेवावीत तसेच पोषण ट्रॅकर सुरू करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जळगाव जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून, सेविका व मदतनीसांनी गणवेश परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रामकृष्ण बी. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रकल्प प्रमुख व बिट प्रमुखांनी केले आहे.
