साईमत, तळोदा : प्रतिनिधी
तालुक्यातील रांझणी गावापासून अवघ्या एक किलोमीटरवरील श्रीकृष्ण गोशाळेसमोर बिबट्याने दर्शन दिले. १५ ते २० मिनिटे बिबट्या गोशाळेसमोर ठाण मांडून होता. त्यामुळे गोशाळेच्या मालकासह रखवालदार जीव मुठीत धरून बसले होते. भेदरलेल्या अवस्थेत त्यांनी मोबाईलवरून गावातील तरुणांना संपर्क करत बिबट्याच्या तावडीतून गायीची व आपली सुटका केली. मात्र, या घटनेमुळे रांझणीसह परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने याबाबत ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
तळोदा तालुक्यातील रांझणी-नवागाव रस्त्याला श्रीकृष्ण गोशाळा आहे. सायंकाळी सात-साडेसातला एक गाय गोशाळेतून सुटून बाहेर पडली होती. गायीचा शोध घेण्यासाठी गोशाळेचे मालक आनंद मराठे, सहकारी विजय ठाकरे, चालक अजय पाडवी, सचिन पाडवी यांना घेऊन गायीच्या शोधासाठी निघाले होते. गाय आढळून आल्यावर तिला पुन्हा गोशाळेत नेत असताना अचानक अवघ्या वीस फुटावर बिबट्या उभा असल्याचे त्यांना दिसले. यावेळी चारही जण भयभीत झाले.
प्रसंगावधान राखत आनंदा मराठे यांनी मोबाईलवरून तत्काळ लहान भाऊ धनराज याला माहिती दिली. त्यानंतर धनराज मराठे यांनी गावातील सागर गोसावी, जयेश पवार, गणेश बोराणे, पिनु भारती, बबलू गायकवाड, भूषण पाचोरे, वसंत पाडवी, सागर मढवी यांच्यासह इतर तरुणांना घटनेबाबत माहिती देऊन त्यांना मदतीसाठी पाठविले. सारे तरुण गोशाळेपासून काही अंतरावर एकत्र येऊन गाड्यांचा आवाज करत बिबट्याला हुसकावून लावले. बिबट्या तेथून गेल्याने आनंदा मराठे यांच्यासह अन्य जणांनी सुटकेच्या नि:श्वास टाकत मदतीला धावून आलेल्या तरुणांचे आभार मानले. वारंवार बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने जनतेकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.