साईमत, शिरपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील उपरपिंड शिवारात तापी नदीपात्रात मंगळवारी, ८ ऑगस्ट रोजी सकाळी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पट्टीच्या पोहणाऱ्यामार्फत मृतदेह दुपारी पाण्याबाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. याप्रकरणी उपरपिंडचे पोलीस पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, शहर पोलिसांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना माहिती देत हद्दीत कोणी बेपत्ता असल्याची माहिती जाणून घेतली. तसेच पोलिसांनी नागरिकांना मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.
सविस्तर असे की, तालुक्यातील उपरपिंड शिवारात तापी नदी काठावर मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाण्यावर तरंगताना एक ३५ वर्षीय अनोळखी पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलीस पाटील यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. मिळालेल्या माहितीवरून शहर पोलीस ठाण्याचे पो.ना. राजेंद्र रोकडे, पो.कॉ. राकेश माळी यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सायंकाळी ५ वाजेच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. तपास पो.ना. राजेंद्र रोकडे करीत आहेत.


