छोट्या टपात घरीच मूर्ती विसर्जन करण्याचा विद्यार्थ्यांनी केला संकल्प
साईमत/धानोरा, ता.चोपडा /प्रतिनिधी :
येथील कै. झिपरू तोताराम महाजन माध्यमिक व नामदेवराव भावसिंग पाटील ज्युनिअर कॉलेजात रविवारी मुख्याध्यापक के.एन.जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या राष्ट्रीय हरित सेना विभागाच्यावतीने पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती बनविणे उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी शालेय समितीचे सदस्य योगेश पाटील, उपमुख्याध्यापक नवल महाजन यांनी धानोरा गावातील मूर्तीकार विशाल भगवान कुंभार यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
हरितसेना शिक्षक देविदास महाजन यांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांमुळे पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम, न विरघळणाऱ्या मुर्त्या व त्यांचे विषारी रंगामुळे नदी, विहीर, तलावाच्या पाण्यातील वाढणारे विषारी तत्व, पाण्यातील मासे आणि इतर सजीवांना त्यामुळे होणाऱ्या जीवघेण्या त्रास याविषयी सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या शाडू मातीच्या मुर्त्या स्थापन करून छोट्या टपात घरीच विसर्जन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांकडून करून घेतला.
१०३ विद्यार्थ्यांनी बनविल्या सुंदर मुर्त्या
मूर्तीकार विशाल कुंभार यांनी प्रात्यक्षिक करुन दाखवून विद्यार्थ्यांकडून मुर्त्या बनवून घेतल्या. १०३ विद्यार्थ्यांनी सुंदर मुर्त्या बनविल्या. आकर्षक, रेखीव व सुंदर रंगकाम करणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हरित सेना विभागाच्यावतीने बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आले. रविवार सुट्टीच्या दिवशी घेण्यात आलेल्या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व त्यांच्या मदत करणाऱ्या मित्र-मैत्रिणींनी पर्यावरणपूरक शाडू मातीचा गणपती मूर्ती बनविण्याचा उपक्रमात आनंदाने सहभाग घेतला.
यांनी केले कौतुक
विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, संचालक बी.एस.महाजन, वामनराव महाजन, योगेश पाटील, सागर चौधरी व पालक यांनी सहभागी सर्व विद्यार्थी, मूर्तीकार विशाल कुंभार, सर्व शिक्षकांचे कौतुक केले. उपक्रमासाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सिराज तडवी, एस.सी.पाटील, एस.एस.पाटील, डिगंबर सोनवणे, कुलदीप महाजन यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित पालकांनी सहकार्य केले.