साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
काही समाजकंटकांनी लोकांची दिशाभूल करून लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन प्रांताधिकारी आणि नगरपालिका यांना अर्ज दिला आहे. सर्वे.नं. ४२५ ‘क’ मध्ये मशिद व मदरसाचे अनधिकृत बांधकाम सुरु आहे, अशी दिशाभूल करून दोन समाजात तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. असे काही घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन, प्रशासन व समाज कंटकांची राहील. त्यामुळे संपूर्ण अर्जाची चौकशी करून यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशीही मागणी मुस्लिम पंच कमेटी स्टेशन मशिद कब्रस्तान आणि पीर दर्गा ट्रस्टने केली आहे. निवेदनाच्या प्रती जळगाव जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, चाळीसगाव तहसीलदार, न.पा. मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांना रवाना केल्या आहेत. निवेदनावर मुस्लिम पंच कमेटी स्टेशन मशिद कब्रस्तान आणि पीर दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष चिरोद्दीन रफीक शेख, सचिव सैय्यद सलीम अजीज, हाफीज जमशेर खान, माजीद लतीफ शेख, जावेद जाहेद सय्यद, शेख महेबूब शेख अब्दुल यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शहरातील धुळे रोड येथील कोतकर कॉलेज शेजारी १९३८ पासून मुस्लीम समाजाची स्मशानभूमी (कब्रस्थान) आहे. ती जागा वक्फ बोर्डच्या नावे लागलेली आहे. तिचा गट नं. ४२५/ १ ‘ब’ असा आहे. कब्रस्तानमध्ये अनेक पिढ्यांचे दफनविधी झालेले आहेत. सर्वे नं. ४२५/अ/१/ब या जागेवर मुस्लिम समाजाने अनेक वर्षापासून मयताच्या प्रेताच्या नमाज पठणसाठी त्या ठिकाणी एक हॉल बांधलेला आहे. तो अत्यंत जीर्ण झाल्यामुळे त्यांचे नूतनीकरण करण्याचे काम ट्रस्टने सुरू केले होते. कोणत्याही प्रकारची मशिद आणि मदरसाचे बांधकाम चाळीसगाव भाग चाळीतून भविष्यातही करणार नाही. परंतु काही लोकांनी गैर समज करून नगर पालिकेला अर्ज करून काम थांबविले आहे. तसेच कब्रस्थानच्या जागेवर कोतकर कॉलेज यांनी अतिक्रमण केल्यामुळे आणि नगरपरिषदेने रस्ता काढल्यामुळे दफनविधी करण्यासाठी जागा कमी पडत होती. शासनाकडे कब्रस्तान दफनविधीसाठी २ एकर जागेची मागणी केली होती.
जागेची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी नगर परिषदेची
शासनाने मागणीची दखल घेऊन १ जुलै २०२२ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चाळीसगाव प्रांताधिकाऱ्यांनी गट नं. ४२५/’क’मध्ये महसूल उपविभागीय अधिकाऱ्याने एक एकर जागा दिली आहे. त्यानुसार गट नं. ४२५ ‘क’ क्षेत्र १ एकर मुस्लीम स्मशानभूमी आणि नगरपरिषद चाळीसगाव म्हणून उतारा दिला आहे. गट नं. ४२५/’क’ मध्ये जागेची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी नगर परिषदेची आहे. असे असतांना ऑर्डरप्रमाणे ट्रस्टने जागेत साफसफाई, देखभाल दुरुस्ती, नवीन बांधकाम असे कोणतेही काम केलेले नाही. ही सर्व जबाबदारी चाळीसगाव नगर परिषदेची होती, असेही निवेदनात नमूद केले आहे.
