सोयगावात संतप्त आंदोलकाकडून टायर जाळण्याचा प्रयत्न

0
29

सोयगाव तालुका शंभर टक्के पाळला बंद

साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :

सोयगावसह तालुक्यात सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी शासनाच्या विरोधात निदर्शने करून सोयगाव शहर व तालुका कडकडीत बंद शंभर टक्के यशस्वी करण्यात आला. दरम्यान, दुपारी एक वाजता संतप्त मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर जाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तातडीने पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. दुपारी आंदोलक संतप्त झाल्याने सोयगावात तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे तणाव निवळला. सकाळी सात वाजेपासून सकल मराठा समाजाने कडकडीत बंद पुकारला होता.

तालुक्यासह ग्रामीण भागातही बंदचे पडसाद उमटले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, शैक्षणिक महाविद्यालये शाळा आदींनीही बंदमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी करून शासनाविरुद्ध निदर्शने करून मराठा समाजाला पन्नास टक्क्यातून व हैद्राबाद गॅझेट व सगे सोयरे अध्यादेश तातडीने काढून आरक्षण देण्याची आग्रही मागणी आंदोलकांनी केली होती.

तालुका प्रशासनाला मागण्यांचे लेखी निवेदन सादर

आरक्षणासाठी दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोयगाव बंद पुकारण्यात आला असल्याचे तालुका समन्वयक विजय काळे यांनी सांगितले. यावेळी बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता सकल मराठा समाजाच्यावतीने तालुका प्रशासनाला मागण्यांचे लेखी निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर सोयगाव तालुका समन्वयक विजय काळे, विजय गव्हाड, शिवाजी दौड, प्रदीप चौधरी, रवी काळे, ईश्वर गव्हाडे, कृष्णा पाटील, पंकज देशमुख, भगवान चौधरी, महेश मानकर, रामा गवळी, बडु कळवत्रे, विजय थोटे, संजय जाधव, एकनाथ गौड, संतोष पवार, नितीन पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here