प्रलंबित अन् विविध मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष
साईमत/जळगाव/प्रतिनिधी:
प्रलंबित आणि विविध मागण्यांकडे सरकार तसेच सेवा पुरवठादार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत राज्यातील १०८ रुग्णवाहिका चालकांनी येत्या मंगळवारी, १ जुलैपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शनिवारी, २८ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णवाहिका चालकांनी माहिती दिली.
जळगाव येथील १०८ रुग्णवाहिका चालक युनियनने दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून चालक अत्यंत महत्त्वाच्या आरोग्य सेवा पुरवित आहेत. मात्र, त्यांना मिळणारे अल्प वेतन, रुग्णवाहिकांची दयनीय अवस्था आणि सुरक्षिततेचा अभाव यासारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात चालकांनी यापूर्वीही अनेकवेळा निवेदने दिली आहे. आंदोलनेही केली आहेत. परंतु, तरीही त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने चालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
मागण्यांवर तातडीने विचार करून योग्य तोडगा काढावा
जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा युनियनच्यावतीने दिला आहे. आंदोलनामुळे राज्याच्या आरोग्य सेवेवर, विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तातडीच्या वैद्यकीय सेवा मिळण्यात अडचण निर्माण होऊ शकते. सरकारने आणि संबंधित सेवा पुरवठादारांनी चालकांच्या मागण्यांवर तातडीने विचार करून योग्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.