साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
अमळनेर येथे नुकत्याच झालेल्या अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात ‘खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड २’ चे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा.चंद्रकांत वानखेडे (माजी संमेलनाध्यक्ष १७ वे विद्रोही साहित्य संमेलन, वर्धा), प्रा.डॉ. वासुदेव मुलाटे (संमेलनाध्यक्ष १८ वे विद्रोही साहित्य संमेलन, अमळनेर), प्रतिमा परदेशी, प्रा.गौतम निकम, प्रा.लीलाधर पाटील, मुकुंद सपकाळे, सतीश निकम आदी मान्यवर उपस्थित होते. हा ग्रंथ चळवळीला, कार्यकर्त्यांला, वाचकाला, संशोधकाला, तरूणांना निश्चितच दिशा देईल, अशी आशा प्रा.गौतम निकम यांनी व्यक्त केली.
‘खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड २’चे संपादक प्रा.गौतम निकम, डॉ.प्रा.सतीश मस्के, वैशाली निकम आहेत. हा ग्रंथ खान्देशातील आंबेडकरी चळवळीचा इतिहास उलगडून दाखविणारा आहे. त्यात आंबेडकरी चळवळीचे दुर्मिळ दस्तऐवज कागदपत्रे, फोटो, खान्देशातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दौरे, खान्देशातील वसतीगृहे, समता सैनिक दलाचे कार्य, स्वतंत्र मजूर पक्षाचे कार्य, अखिल भारतीय दलित फेडरेशनचे कार्य, भिल्ल आदिवासी आंबेडकरी चळवळ, सत्यशोधक समाजाची चळवळ, समाज प्रबोधनात्मक जलसा चळवळ, कामगार चळवळ, स्त्री चळवळ, विद्यार्थी चळवळ, नियतकालिके, साहित्य संपदा अस्पृश्यांची, स्त्रियांची शैक्षणिक स्थिती, भारतीय बौद्ध महासभेचे कार्य, बैल पोळा केस आदी संदर्भातील दस्तऐवज फोटो ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत.