साईमत, नवापूर: प्रतिनिधी
दलितांवरील अत्याचाराबाबत नवापूर येथील दलित समाज बांधवांनी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन निवेदन दिले. हरेगाव ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर येथील कबुतर व बकरी चोरीच्या संशयावरुन ४ दलित युवक कुणाल मगरे, ओम गायकवाड, प्रणय खंडागळे व शुभम माघाडे यांना अर्धनग्न करुन झाडाला उलटे बांधले. त्यांना अमानुषपणे मारहाण करुन अत्याचार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच अंगावर लघवी करुन, बुटावरील थुंकी चाटायला लावणारे गावगुंड युवराज गलांडे, मनोज बोखडे, पप्पु पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजु बोरसे आणि त्यांचे साथीदार यांना अंडर ट्रायल ठेवून केस जलद गतीने चालवून फाशीची शिक्षा द्यावी. रामनगर मंगठा रोड, जालना येथील गायरान जमीनीवर कब्जा केला म्हणून विरोध करणारे संतोष आढाव यांचा खुन करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशी देणे, दलितांवरील अत्याचार रोखण्यास केंद्र व राज्य सरकार अपयशी होत आहे. दलितांवरील अत्याचार थांबविण्यासाठी कठोर कारवाई करणे, अँट्रासिटी अंतर्गत अत्याचाराचा दाखल गुन्ह्याच्या तपासाठी मागासवर्गीय अधिकारी व कायदेतज्ज्ञांची एस.आय.टी. प्रत्येक जिल्ह्यावर गठीत करण्याचे आदेश देण्याबाबत सातारा जिल्ह्यातील पाणवन नावाच्या गावात शाहीदा तुपे या मातंग समाजाच्या महिलेला अमानुषपणे केलेली मारहाणबाबत संपूर्ण नवापूर शहरातील समाज बांधवांकडून निवेदन दिले आहे.
केंद्रासह राज्यात भाजपाचे सरकार स्थापित झाल्यापासून देशात आणि महाराष्ट्रात दलितांवरील अत्याचार, खून, बलात्कार, मारहाण ते बहिष्कारापर्यंत गुन्हे घडत आहे. त्यामुळे अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच सरकार दलितांवरील अत्याचार रोखण्यास अपयशी ठरत आहे. यापुर्वीच्या सरकारमध्येही अत्याचार होत होते. परंतु, केंद्रातील भाजपा सरकार स्थापनेपासून हे प्रमाण दुप्पटीने वाढले आहे. आजच्या स्थितीत प्रती १ लाख दलित संख्येमागे सरासरी ४० ते ४५ दलित समाजावर अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. सरकार अत्याचार रोखण्यास सक्षम खंबीर कायदा बनवित नसल्यामुळे हा सरकार प्रेरित अत्याचार आहे, अशी आंबेडकरी समाजाची धारणा झाली. दलितांवरील अत्याचार रोखणे, आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देणे, तपासासाठी मागासवर्गीय कायदेतज्ज्ञांची जिल्हानिहाय एस.आय.टी. गठीत करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे, मनोहर नगराळे, सुनील वाघ, छोटु अहिरे, विजय तिजवीज, विजय पवार, प्रदीप नगराळे, योगेश साळवे, आकाश बिराडे, ललीत बिराडे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.