साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आणि पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान अंतर्गत मानसिक आरोग्यावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यात महाविद्यालयातील ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते समाज कार्य महाविद्यालयाचे डॉ. जगदीश सोनवणे होते. अध्यक्षस्थानी प्रा.विजयकुमार वाघमारे होते. सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्वागत समारंभ झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. जगदीश सोनवणे यांनी ‘महिलांचे मानसिक आरोग्य’ याबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये महिलांच्या मानसिक समस्या, सामाजिक जडणघडण व आजाराबाबत चर्चा केली. तसेच मानसिक आरोग्यावर विद्यार्थ्यांनी पोस्टर तयार करून आणले. पोस्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयकुमार वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.
यशस्वीतेसाठी प्राचार्य पी. एस. पाटील, अभिजीत भांडारकर यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम नियोजन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ.अनिता खेडकर यांनी केले. तसेच प्रा.विजयकुमार वाघमारे, प्रा. डॉ.श्वेता वैद्य, प्रा.डॉ.अस्मिता, प्रा. डॉ. भरत खंडागडे, प्रा. डॉ. जगदीश सोनवणे, प्रा. धनराज ढगे, प्रा. डॉ. सागर चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक अनिल वाणी, ज्योती सोनार, महेश शेलार यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन नंदिनी मैराळे हिने तर आभार मोहिनी धनगर हिने मानले.