Amalner Taluka Heavy Rainfall : अमळनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे फटका : जीवनावश्यक वस्तूंसह शेतांचे नुकसान

0
12

अधिकाऱ्यांसह तहसिलदारांनी संबंधितांना पाठवले आपदग्रस्तांच्या मदतीला 

साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : 

तालुक्यातील मारवड मंडळात शुक्रवारी, २९ रोजी १२० मिमी पाऊस झाल्याने वासरे येथील वस्तीत पाणी शिरल्याने सुमारे ८० घरातील अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाल्याने ते कुटुंब उघड्यावर आले आहेत. अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी वस्त्यांमध्ये पाणी, गावांचा संपर्क तुटला. तसेच शेतांचे अतोनात नुकसान झाले. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी तातडीने ग्राम महसूल अधिकारी यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना आपदग्रस्तांच्या मदतीला पाठवले होते.

वासरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील गल्लीतील लोकांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढून त्यांना समाज मंदिरात तसेच गावातील उंच ठिकाणी असलेल्या घरांमध्ये राहण्याची सोय केली. सुमारे ८० कुटुंब उघड्यावर आली आहेत. काहींची घरे पडली तर सर्वांच्या घरातील गृहोपयोगी वस्तू, अन्न-धान्याची नासाडी झाली. इतर ग्रामस्थ मदतीला धावले आणि त्यांच्यातर्फे उघड्यावर पडलेल्या परिवाराच्या भोजनाची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीने त्यांना शिधा वाटप केले. कळमसरे, निम, शहापूर येथील अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांना ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात हलविण्यात आले आहे. तसेच टाकरखेडा येथे ढगफुटी सदृश्य पावसामुळे हजारो हेक्टर मका, कपाशी आणि उडीद, मूग पिकांचे नुकसान झाले आहे. पिके शेतात आडवी पडली आहेत.

प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना

घटनास्थळी खासदार स्मिता वाघ, जि.प.च्या माजी सदस्य जयश्री पाटील, भैरवी पलांडे, डॉ.अनिल शिंदे यांच्यासह प्रशांत धमके यांनी वासरे व इतर गावांना भेटी देऊन आपदग्रस्तांना सहानुभूती दाखविली. तसेच खा.वाघ आणि आ.अनिल पाटील यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. दुसऱ्या दिवशीही पाऊस सुरू असल्याने तालुक्यात नेमके किती नुकसान झाले? हे मात्र अद्यापपर्यंत कळू शकलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here