नागरिकांनी रेती डंपर वाहतूक रोखून आंदोलन केले
साईमत/ अमळनेर/ प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात भीषण अपघात झाला, ज्यात भरधाव रेतीने भरलेल्या डंपरने मोटारसायकलस्वार घनश्याम तुकाराम पाटील (वय सुमारे ३५, रा. पवन चौक, मुठे गल्ली) यांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची बातमी समजताच परिसरात खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये हळहळ व संतापाचे वातावरण निर्माण झाले.
अपघात दगडी दरवाजा ते फरशी पुल या परिसरात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, घनश्याम पाटील मोटारसायकलवरून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या रेती डंपरने त्यांना चिरडले. धडक इतकी भीषण होती की त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
मृतक घनश्याम पाटील यांच्या पश्चात आई आणि पत्नी असा लहान कुटुंब आहे. वडिलांचे यापूर्वीच निधन झाले असल्याचे कळते. ते यापूर्वी गॅरेजमध्ये काम करत होते, नंतर आचारीकडे रोजगार घेतला होता.
दरम्यान, अमळनेर शहरातील बेफाम रेती डंपर वाहतुकीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर दिवस-रात्र अंदाजे ५० ते ६० डंपरची ये-जा सुरू असते. अनेकदा तक्रारी केल्या असूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात येतो.
या घटनेनंतर काही नागरिकांनी रेती डंपर वाहतूक रोखून आंदोलन केले. स्थानिकांनी व्यक्त केले की, प्रशासनाने वेळेत कारवाई केली असती तर हा दुर्दैवी अपघात टळला असता.
सध्या या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. प्रशासनाचे आगामी पावले आणि रेती वाहतुकीबाबतच्या नियमांबाबत नागरिकांचे लक्ष लागले आहे.
