साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी वाचनालय आणि मोफत वाचनालयातर्फे ‘भिजकी वही’ अभिवाचनाचा प्रयोग अमळनेरला जुन्या टाऊन हॉल येथे महिला दिनाच्या पूर्व संध्येला हा कार्यक्रम पार पडला. जळगावातील परिवर्तन संस्थेच्या टिमने अभिवाचनाचा अप्रतिम प्रयोग सादर केला. कवी, लेखक, जे.जे. आर्टचे कुंचलाकार अरुण कोल्हटकर यांनी लिहिलेल्या ‘भिजकी वही’ ह्या कवितासंग्रहावर शंभू पाटील तथा खान्देशची शान शंभू अण्णा यांच्या सुमधुर, कानाला तृप्त करणाऱ्या भाषा शैलीत अभिवाचनाचा कार्यक्रम सादर केला. ह्या प्रयोगाने सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
‘भिजकी वही’ कवितेच्या दालनाने महिला जीवनाची व्यथा सुंदररित्या सादर केली आहे. अरुण कोल्हटकर ह्या अवलियाने महिलांच्या जीवनाचे अतिसूक्ष्म वर्णन यात आहे. लैला व मजनु यात मजनुच्या पुरुषप्रधान चरित्राला वाढविले. परंतु निरपेक्ष प्रेम करणारा कैस महंमद दिसला नाही. महिलेला बदनाम करणारी पुरुषप्रधान संस्कृती स्त्रीला कसे बदनाम करते यावर अरुण कोल्हटकरांनी सुंदर भाष्य केले. अद्वैत व बहुदैवत्व ह्या संकल्पना त्यांनी दाखविल्या. प्रेम सांगणारा धर्म स्वतःच्या धर्मासाठी रक्ताची रांगोळी करतो. धर्माला मानवतेचा अर्थ समजला नाही. परंतु सामान्य महिला लोकांना एक सुंदर आदर्श ठरतात. महिलांवर आजही बलात्कार होतात, ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. मेरी येशूच्या प्रेमासाठी आतूर पण येशू तिला प्रेम देऊ शकला नाही. अशा सुंदर काव्याला रसिकांपर्यंत पोहचविण्याचे धाडस परिवर्तन टिमने केले आहे. यावेळी महिलांसह रसिक उपस्थित होते.
यांनी केले सादरीकरण
‘भिजकी वही’चे शंभू पाटील, सुदीप्ता सरकार, मंजुषा भिडे, अपूर्वा पाटील, अंजली पाटील, सोनाली पाटील, हर्षल पाटील, मोना निंबाळकर, नेहा पवार, प्रकाश योजना राहुल निंबाळकर, नेपथ्य प्रवीण पाटील, वेशभूषा पल्लवी सोनवणे यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.