आ. अनिल पाटील यांचा पाठपुरावा यशस्वी
साईमत /अमळनेर / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या २०२६–२७ च्या अर्थसंकल्पात अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाल्याची आनंदाची माहिती आमदार आ. अनिल पाटील यांनी दिली. या निधीतून मतदारसंघातील महत्त्वाच्या रस्त्यांची दुरुस्ती, मजबुतीकरण तसेच इतर पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार असून स्थानिक विकासाला चालना मिळेल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अमळनेर मतदारसंघात सातत्याने विकासकामांचा आलेख वाढत असल्याचे दिसून येत आहे. रस्ते, पूल तसेच इतर पायाभूत सुविधांची अनेक कामे पूर्ण झाली असून काही कामे वेगाने सुरू आहेत. यामुळे मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलत असल्याचे स्थानिक नागरिकांकडूनही नमूद केले जात आहे. यावर्षी अर्थसंकल्पात पुन्हा २५ कोटींचा निधी मिळाल्याने मतदारसंघात समाधानाचे वातावरण आहे.
मुख्य रस्त्यांसाठी निधीचे वाटप
-
मेहेरगाव–धुळे–अमळनेर–चोपडा–खरगोन (राज्यमार्ग क्र. १५): रेल्वे उड्डाणपुल ते दहिवद फाटा रस्त्याच्या सुधारणेसाठी ६ कोटी रुपये
-
मुसळी फाटा–धरणगाव–अमळनेर–शिंदखेडा (राज्यमार्ग क्र. ६): भरवस ते रेल्वे बोगदा रस्त्याच्या सुधारणेसाठी ४ कोटी रुपये
-
रा.मा. ३९ ते जांभोरा–ढेकू–हेडावे–अमळनेर–शिरसाळे–वावडे–मांडळ: शिरसाळे ते वावडे रस्त्याच्या सुधारणा २.५ कोटी रुपये
-
बोळे–मोंढाळे–फाफोरे–अमळनेर–मारवड–निंम–कपिलेश्वर: कळमसरे ते निंम रस्त्याच्या सुधारणा २.५ कोटी रुपये
-
प्रजिमा-०३ मार्ग (चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर–कलाली–निंभोरा–पिंगळवाडे–नंदगाव): निंभोरा ते पिंगळवाडे भागातील चिखली नदीवरील पुलासाठी २.५ कोटी रुपये
-
बोळे–मोंढाळे–फाफोरे–अमळनेर–मारवड–निंम–कपिलेश्वर: धार ते मारवड रस्त्याच्या सुधारणा २.५ कोटी रुपये
-
रुबजी नगर ते हिंगोणा: रस्त्याच्या मजबुतीकरणास १ कोटी रुपये
-
अमळनेर ते धार मार्ग: २.५ कोटी रुपये
-
पारोळा तालुका (बहादरपूर ते फाफोरे): रस्त्याच्या सुधारणेस १.५ कोटी रुपये
एकूण २५ कोटींच्या या निधीमुळे मतदारसंघातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासोबतच ग्रामीण भागातील संपर्क मार्ग अधिक मजबूत होतील, नागरिकांना प्रवास सुलभ होईल तसेच विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
आमदार पाटील यांनी या निधीसाठी सहकार्य केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनित्रा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले.
या यशस्वी प्रयत्नामुळे अमळनेर मतदारसंघात भविष्यातील विकासाचा मार्ग अधिक उजळणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.
