साईमत, चोपडा : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना एकत्रीतरित्या काम करावे लागते. एकमेकात विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमात पालकांनी सहभागी व्हावे. स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थ्यांनी सराव करावा, यासाठी शाळाबाह्य परीक्षेत विद्यार्थ्यांना बसवावे. विद्यार्थी केंद्र बिंदू असला तरी पालक महत्त्वाचा घटक असल्याचे प्रतिपादन कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एच.बी.मोरे यांनी केले. कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाची पालक-शिक्षक सहविचार सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष कल्पना बोरसे, संगीता सोनवणे, पर्यवेक्षक एस. एल. पाटील यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थित होते.
प्रास्ताविकात पर्यवेक्षक एस. एल. पाटील यांनी सांगितले की, विद्यालयात मागील अनेक वर्षांपासून १० साठी उन्हाळी वर्ग घेत आहोत. तसेच ५ वी व ८ वी वर्गांना शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएसचे मोफत वर्गाचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. यामध्ये विद्यार्थी गुणवत्तेत आला तर त्यास शासनाकडून शिष्यवृत्ती मिळते. अप्रगत तासिका वर्गही घेतले जात असून विद्यालयात संगणक कक्ष, स्मार्ट रूम व प्रयोगशाळा आदी सोयी सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून सविता पाटील, शिक्षक आनंदा जाधव या पालकांनी मनोगत व्यक्त केले. सभेस १४० पालक उपस्थित होते. सुत्रसंचालन जयेश पाटील तर आभार कपिल बाविस्कर यांनी मानले.