साईमत, जळगाव : प्रतिनिधी
पहिल्यासारखे एकछत्री सरकार आता नाही. वरती भाजप, धड शिवसेनेची तर हातपाय राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले सरकार आहे. तरीही आम्ही कामे करत आहोत. तुम्हीही पालकमंत्री होता. तुमच्या काळात साधी एस. टी. चालकांची भरती झाली नाही, अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर टीका केली.
शिवसेनेतर्फे आगामी निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघात गणनिहाय मेळाव्ो घेण्यात येत आहेत. तालुक्यातील भादली येथील मेळाव्यात मंत्री पाटील बोलत होते. जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. टीका करणाऱ्यांना त्यांनी या सभेत आव्हान दिले. मंत्री पाटील म्हणाले, आम्हाला कोणावर ठपका ठेवायचा नाही. आम्ही शिंदे गटात गेल्यानंतर राष्ट्रवादीवाले ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा देत होते. अजीत पवार आमच्यासोबत आल्यानंतर त्यांची तोंडं उघडत नाहीत.
आम्ही काम करणारे लोक
काही लोक म्हणतात, गुलाबराव पाटील काम करतात म्हणजे काही उपकार करतात का? आम्ही काही तुमच्यासारखे मजूर फेडरेशनचे कमीशन खात नाही. तो आमचा धंदा नाही. आम्ही लोकांसाठी कामे करतो. काम केले की, पहिले दोन टक्के कापून घेता. मी किती स्वच्छ असल्याचा आव आणता. अजीत पवार व अनिल पाटलांचा सत्कार करताहेत. शरद पवार जिंदाबादचे नारे देता आहेत आणि दुसरीकडे विरोधही करताहेत. त्यांनी आधी शरद पवार की अजीत पवार गटाचे आहेत, हे सिध्द कराव्ो,अशी टीकाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर केली. हे लोक स्थिर नाहीत. वर्षभर गद्दारीचे आरोप आम्ही सहन केले. त्याकडे दुर्लक्ष करत आम्ही जनतेचे काम करत असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची चाचपणी
दुष्काळ सदृश्य भागात कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी होत आहे. शासनपातळीवर त्याबाबत विचार सुरु आहे. मागील काळात मी कृत्रिम पाऊस पाडण्याची कॅबीनेटमध्ये मागणी केली होती. आताही मागणी होत आहे, पण पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेण्यात येईल,आशी माहिती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जिल्हा नियोजन भवनात स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्कार कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांच्या अडचणी सोडवण्याचे आदेश देखील जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारी घेतल्या आहेत. राज्य पातळीवरील प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. केंद्र शासनाकडील प्रश्नांबाबत खासदारांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहे.
कृत्रिम पाऊस, दुष्काळ नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार : एकनाथराव खडसे
जळगाव : जिल्ह्यासह राज्यात पावसाने ओढ दिली आहे. पिके धोक्यात असून, ऐन श्रावणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्धेअधिक प्रकल्प अद्याप कोरडे असून, पाऊस येण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे सरकारने कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचपणी करून त्यासंबंधी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये तसेच थेट उत्तर महाराष्ट्रात नाशिकपासून विदर्भापर्यंत व मराठवाड्यातही पुरेसा पाऊस झालेला नाही. प्रकल्प कोरडे आहेत. गेल्यावर्षी सुरू झालेले टँकर अद्याप काही जिल्ह्यांमध्ये सुरूच असून, ऑगस्ट महिना उलटला तरी टँकरच्या संख्येत आणि टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढच होत आहे. आता पावसाचा केवळ सप्टेंबर महिना राहिला असून, परतीच्या पावसाचे व्ोध लागले आहेत. दुष्काळाचे भीषण वास्तव समोर असताना सरकार मात्र त्याबाबत उदासीन आहे. २०१५ मध्ये तत्कालीन सरकारमध्ये असताना अशीच दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्याव्ोळी महसूलमंत्री म्हणून राज्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचपणी केली होती, असे खडसे यांनी नमूद केले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी पाणी, चारा आदींची व्यवस्था करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत, तसेच विरोधी पक्षांच्या वतीने सरकारला निव्ोदनही देणार आहोत, असेही खडसे यांनी सांगितले.