सुवर्णाताई स्मृती उद्यान, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जलतरण तलाव नूतनीकरणासह सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
शहरातील रस्ते, शासकीय कार्यालय व वीज अशा पायाभूत सुविधांचा प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचे काम प्रगतीपथावर सध्या सुरू आहे. मात्र, त्यासह नागरिकांना मनोरंजन, विरंगुळा, आरोग्य सेवांसह खेळाडूंना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुवर्णताई स्मृती उद्यान व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव सुशोभीकरण प्रकल्पाचे काम हाती घेतले आहेत. त्यामुळे शहराची वाटचाल विकासाच्या दूरदृष्टीकोनातून आरोग्य हिताकडे चालली आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडणार असल्याचे प्रतिपादन आ.मंगेश चव्हाण यांनी केले. त्यांच्या हस्ते सुवर्णाताई स्मृती उद्यान व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरणाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चाळीसगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शहरातील भडगाव रस्त्यावरील नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सुवर्णाताई स्मृती उद्यानाचा सुशोभिकरण भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. उद्यानासाठी १० कोटींचा भरघोस निधी पहिल्या टप्प्यात आ.मंगेश चव्हाण यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्याचसोबत नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलावासाठी ४ कोटी ५० लाखांचा निधी असे दोन्ही कामांसाठी आ.चव्हाण यांच्या पाठपुराव्याने निधी मंजूर झाला आहे. यावेळी तलावाचेही भूमिपूजन करण्यात आले.
अनेक वर्षांपासून सुवर्णाताई स्मृती उद्यान व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव दुरावस्थेत होते. जॉगिंग ग्रुप आणि स्विमिंग असोसिएशनने नेहमीच याबाबतीत आपली नाराजी व्यक्त केली होती. आता आ. चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयामुळे लवकरच उद्यान व जलतरण तलावाचे रूप बदलणार असल्याचे समाधान शहरवासियांनी व्यक्त केले आहे. तसेच शिवबाबा ग्रुप व जॉगिंग ग्रुपने आ.चव्हाण यांचा सत्कार केला.
शहराचा विकास घडवणारच
मला प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे नाही आणि तुम्हाला स्वप्न ही दाखवायची नाही. पण मी केलेली कामे बघून तुम्ही स्वप्न बघत असल्याची जाणीव तुम्हाला नक्की होईल यात शंका नाही. राजकारण हा माझा व्यवसाय नसून मला राजकारणात पैसा कमवायचा नाही तर शहराचा विकास घडवायचा आहे आणि मी ते घडवणारच आहे, असेही आ.मंगेश चव्हाण यांनी सांगितले.