साईमत, जळगाव : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार करणे गरजेचे आहे. नोकरीच्या पॅकेज सोबत आपले पालक अर्थात आई-वडील आनंदाने, समाधानाने सोबत असणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वक्ते गनी मेमन यांनी केले. मायादेवी नगर येथील रोटरी भवन येथे रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे ‘माय फ्युचर, माय रिस्पॉन्सिबिलिटी’ विषयावर ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष सरिता खाचणे, मानद सचिव मुनिरा तरवारी उपस्थित होते.
व्याख्यानात मेमन यांनी विद्यार्थ्यांना पदवी सोबत अनुभव महत्त्वाचा आहे. वेगळे काही कराल तर तुमची ओळख निर्माण होईल. जीवन सुंदर आहे, त्यात चढ-उतार, यश- अपयश येणार आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडणार नाही. त्यामुळे आत्महत्या घडताना आपण पाहतो. त्यासाठी प्रत्येकाजवळ ‘बी प्लॅन’ असला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. पालकांनी भावनिक होऊ नये. केवळ औपचारिक म्हणून नव्हे तर चांगला संवाद आपल्या पाल्यांसोबत केला पाहिजे. पाल्यांनीही पैसा सबकुछ आहे, असे न मानता पालकांचे आपल्यासाठीच्या योगदानाची जाणीव ठेवावी. आई – वडिलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असेही गनी मेमन यांनी शेवटी सांगितले.
कार्यक्रमात दहावी, बारावी परीक्षेतील रोटरी वेस्टच्या परिवारातील देवांशी कोठारी, तनुश्री दप्तरी, मोक्षदा गुरव, मनन राका, रत्नेश झंवर, ऋषिका मणियार, कृष्णा मणियार, जीया चांदिवाल यांचा पालकांसह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परिचय माजी अध्यक्ष नितीन रेदासनी यांनी तर आभार विनीत जोशी यांनी मानले.कार्यक्रमास रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष रमण जाजू, नितीन रेदासनी, डॉ.सुशीलकुमार राणे, योगेश भोळे, सुनील सुखवानी, चंद्रकांत सतरा आदी मान्यवरांसह सदस्यांची कुटुंबीयांसह उपस्थिती होती.