कंडारी जि.प. शाळेच्या भेटीप्रसंगी केंद्रप्रमुख प्रदीप राजपूत यांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
आधुनिक तंत्रज्ञानासह उपक्रमशील अध्यापन आणि सुरक्षित, प्रेरणादायी शालेय वातावरण ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ‘गुरूकिल्ली’ आहे. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकांवर अवलंबून न राहता अध्ययन निष्पत्तीची साध्यता केली तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. यासाठी शिक्षकांनी कमकुवत विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष देऊन त्यांना प्रोत्साहित करावे. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. शिक्षक अध्यापनासोबत ‘समुपदेशकाची’ भूमिकाही बजावतात, असे प्रतिपादन केंद्रप्रमुख प्रदीप राजपूत यांनी केले. कंडारी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत त्यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विशेष शिक्षक जिभाऊ गर्दे, पदवीधर शिक्षक ज्योती वाघ, डॉ. जगदीश पाटील, उपशिक्षक सुनंदा रोझदकर, सविता निंभोरे, विनोद जयकर, गणेश तांबे, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी शाम चिमणकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री.राजपूत यांनी शाळेतील शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती साध्यतेबाबत शिक्षकांसह विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. वर्गभेटीवेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांची शैक्षणिक समज तपासली. अभ्यासाविषयी त्यांची आवड, वाचन-लेखन कौशल्ये, तसेच समस्या सोडविण्याची क्षमता जाणून घेतली.
शाळेचे वातावरण, शिस्त अन् शिक्षकांच्या प्रयत्नांचे मानले समाधान
यावेळी शिक्षकांशी चर्चा करून अध्यापन पद्धतीत उपक्रमशीलता वाढवण्याचे व प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शाळेचे वातावरण, शिस्त आणि शिक्षकांचे प्रयत्न पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. गावातील शाळाच ही मुलांच्या भविष्यासाठी पायाभूत आहे. प्रत्येकाने चांगले शिक्षण घेऊन समाज आणि राष्ट्राच्या विकासात आपला वाटा उचलावा, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.