साईमत, जामनेर : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या शाळेत आपण मेहनत घेत आहोत. मात्र, काळानुरूप आपणास बदल करावे लागतील. तंत्रज्ञानाची सांगड घालून बालकांचा सर्वांगिण विकास करावयाचा आहे, असे मत वाकोद केंद्राचे केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील जांभोळला वाकोद केंद्राची तिसरी शिक्षण परिषद केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे आणि जांभूळ शाळेच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच उत्साहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अरुण सोनवणे होते.
शिक्षण परिषदेत सर्व शाळांनी आपल्या शाळेतील यशोगाथा लकी ड्रॉ पद्धतीने सादर केल्या. त्यात वडगाव, कुंभारी आणि वाकोद या शाळांना संधी मिळाली. कुंभारी शाळेचे उपशिक्षक प्रशांत वाघ यांनी आयसीटीचा वापर व शीट निर्मितीबद्दल प्रात्यक्षिक घेतले. जांभोळ शाळेतील उपशिक्षक अनिल माळी यांनी नवोपक्रम स्पर्धा अहवाल लेखन व सादरीकरण कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरोदे यांनी सुचविलेले ‘गुणी शिक्षक गुणवंत शाळा’ पुस्तकाचे वाचन जांभोळचे उपशिक्षक गणेश माळी यांनी केले. प्रशासकीय बाबींवर वाकोद केंद्राचे केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांनी सविस्तर चर्चा केली. जि.प.शाळा जांभोळ येथील ज्ञानज्योती सावित्रीमाई ग्रुप यांनी ईशस्तवन तर आऊसाहेब जिजाऊ ग्रुप यांनी स्वागत गीत सादर केले. परिषदेवेळी विजया अहिरे यांना निरोप देण्यात आला. तसेच आदर्श पुरस्काराबद्दल केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे, शारदा शिंपी यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षण परिषदेसाठी हरीनगर, कुंभारी, पिंपळगाव बु, वडाळी, पिंपळगाव तांडा, वडगाव, पिंपळगाव खुर्द, वाकोद, वाकोद, वाडी येथील शिक्षक वृंद उपस्थित होते. शिक्षण परिषदेसाठी गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार, विस्तार अधिकारी विजय सरोदे, शापोआचे अधीक्षक विष्णू काळे, केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे, विकास वराडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
यांनी घेतले परिश्रम
शिक्षण परिषदेसाठी जांभोळ येथील शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य लाभले. परिषदेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल केंद्रप्रमुखांनी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक अशोक पाटील आणि त्यांचे सहकाऱ्यांचे कौतुक केले. यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे, मुख्याध्यापक अशोक पाटील, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आशा तडवी, मुनाफ तडवी, रवी वाघ, सचिन पाटील, सलीम तडवी, सुभाष शेळके, अशोक कोलते, मुकुंदा जोशी, ईश्वर पांढरे, अंगणवाडी सेविका अरुणा जाधव, सीमा डोखळे, सुनिता देशमुख, प्रतिभा गावंडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अनिल माळी तर आभार संदीप सोनवणे यांनी मानले.