रेल्वे अपघातात गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्यास आईच्या नुकसानभरपाईव्यतिरिक्त ८ लाख रुपये स्वतंत्र द्यावे
साईमत / अलाहाबाद / प्रतिनिधी
अलाहाबाद उच्च न्यायालयाने गर्भातील बाळाच्या मृत्यूपर्यायी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, जर आईच्या गर्भात ५ महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळाचे बाळ असेल, तर त्याला जिवंत मुलासारखे मानले जावे. अशा परिस्थितीत, रेल्वे अपघातात गर्भातील बाळाचा मृत्यू झाला, तर रेल्वेला आईच्या नुकसानभरपाईव्यतिरिक्त वेगळी (स्वतंत्र) भरपाई द्यावी लागेल, असे न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
‘लाईव्ह लॉ’च्या वृत्तानुसार, एका गर्भवती महिलेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. आधी रेल्वे क्लेम्स ट्रिब्युनल ने केवळ महिलेच्या मृत्यूसाठी भरपाई मंजूर केली होती, पण गर्भातील बाळासाठी भरपाई नाकारली होती. या निर्णयाला आव्हान देऊन न्यायालयात सुनावणी झाली.
उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, ५ महिने पूर्ण झालेले गर्भ कायदेशीरदृष्ट्या जिवंत बालकासमान आहे. या बाळाच्या मृत्यूसाठी कुटुंबीयांना ८ लाख रुपयांची अतिरिक्त भरपाई देण्याचे आदेश रेल्वेला दिले आहेत. न्यायालयाने असेही म्हटले की, आईचा मृत्यू आणि गर्भातील बाळाचा मृत्यू हे दोन स्वतंत्र घटना मानल्या जाव्यात, त्यामुळे दोन्हीसाठी स्वतंत्र भरपाई मिळणे हे पीडित कुटुंबाचे हक्काचे आहे.
न्यायालयाच्या निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे
गर्भातील अर्भक जिवंत बालकासमान मानला जाईल.
मातेच्या गर्भात ५ महिने पूर्ण झालेले आणि जन्मास येईपर्यंतचे बालक अस्तित्वात असलेल्या बालकासमान मानले जाईल.
मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Act) मुलांसाठीची भरपाई प्रौढ व्यक्तीपेक्षा वेगळी मोजली जाते.
रेल्वे अपघात आणि अपघाती घटना (भरपाई) नियम १९९० नुसार मृत्यू झाल्यास ८ लाख रुपये भरपाई दिली जाईल.
गर्भातील बाळाचा मृत्यू हा मातेच्या मृत्यूपेक्षा स्वतंत्र मानला जाईल, त्यामुळे अर्जदार ८ लाख रुपयांच्या अतिरिक्त भरपाईसाठी पात्र आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने कर्नाटक, दिल्ली आणि मद्रास उच्च न्यायालयांच्या अशाच प्रकारच्या निकालांचा संदर्भ घेत हा निर्णय दिला आहे.
