साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील अकलूद येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील लाखोंचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी, २९ जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, राजेश गुनघरजी नखाते (जैन, वय ४५, रा. प्लॉट नंबर ४१, समर्थ नगर, अकलुद, ता. यावल) हे पत्नी ज्योती, मुले तेजल आणि जय परिवारासह वास्तव्याला आहे. ते प्रॉपर्टी ब्रोकरचे काम करुन उदरनिर्वाह करतात. शनिवारी, २७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता अकलुद येथुन मुंबई येथे सेमीनारसाठी गेले होते.तेव्हा ज्योती नखाते ह्या रात्री ९.३० वाजता अकलुद येथुन अकोला येथे गेल्या होत्या. सोमवारी, २९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास नखाते हे मुंबई येथुन अकलुद येथे आले होते. तेव्हा घराचे लोखंडी फाटकाचे गेटचे कुलुप उघडले. घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप उघडत घराचे मुख्य लोखंडी दरवाजाची जाळी चोरट्यांनी कापलेली आढळून आली.
घरफोडीत ४० हजार रुपये किंमतीची एक सोन्याची अंगठी, सुमारे १० ग्रॅम वजनाची ६० हजार रुपये किंमतीच्या ३ सोन्याच्या अंगठ्या, प्रत्येकी सुमारे ५ ग्रॅम वजनाच्या २४ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, प्रत्येकी सुमारे ३ ग्रॅम वजनाच्या १ लाख रुपये किंमतीचे ५ कानातील सोन्याचे (एकुण २५ ग्रॅम वजनाच्या) जोड, प्रत्येकी सुमारे ५ ग्रॅम वजनाचे ८० हजार रुपये किंमतीची एक १०० सोन्याचे मण्यांची पोत त्यात एक सोन्याचे डोरल्यांचे जोडसह (सुमारे २० ग्रॅम वजनाची) त्यात काळे मणी असलेली ५२ हजार रुपये किमतीची एक सोन्याची पोत त्यात एक सोन्याचे डोरल्यांचा जोड असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.