अजित पवारांचा बाजार समितीत मार्चमध्ये अनावरण होणार महाराष्ट्रातील पहिला शेतकरी पुतळा
साईमत/अमळनेर/प्रतिनिधी:
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेतकरी रूपातील महाराष्ट्रातील पहिला पुतळा अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारला जाणार असल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी सांगितले की, मार्च महिन्यात होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या पुतळ्याचे अनावरण होईल. या निर्णयामुळे अमळनेर तालुक्यात राजकीय तसेच सामाजिक स्तरावर मोठ्या चर्चेला उधाण आले आहे.
अजित पवार यांचे अमळनेरशी विशेष नाते आहे. आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष स्व. सुरेश ललवाणी यांच्या सहकार्याने तालुक्यातील विकासाला गती मिळाली. बाजार समितीच्या आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभारामुळे अमळनेर बाजार समितीने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून शेतकरी रूपातील पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला गेला.
सभापती अशोक पाटील यांनी सांगितले की, आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार स्मिता वाघ यांच्या सहकार्याने बाजार समितीने प्रगतीची झेप घेतली आहे. उपसभापती, संचालक मंडळ, व्यापारी, सचिव, कर्मचारी, हमाल, मापाडी आणि गुमास्ता यांच्या प्रयत्नांमुळे समितीचा कारभार अधिक शिस्तबद्ध व पारदर्शक झाला आहे. आवक वाढल्याने पणन कर्जाची नियमित परतफेड झाली असून सुपरव्हिजन फी व अंशदान नियमित भरल्यामुळे पणन विभागाकडून सुमारे सहा लाख रुपयांचा बोनस प्राप्त झाला. हा बोनस निधी मार्चमधील सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांचा सत्कार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
बाजार समितीच्या आवारात १३६ दुकानांच्या गाळ्यांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे, नवीन लेखापाल कार्यालय उभारण्यात आले आहे. पातोंडा उपबाजारात वे-ब्रिजची सुविधा सुरू झाली आहे, तर बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन कार्यान्वित झाले आहे. मारवड उपबाजार समितीत संरक्षक भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले असून या सर्व विकासकामांचे उद्घाटन लवकरच पार पडणार आहे.
याशिवाय शेतकरी भवन, हमाल-मापाडी भवन आणि व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज २०० फूट शेडचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. उन्हाळ्यात लिलावासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत थंड पेय, तर हिवाळा व पावसाळ्यात मोफत चहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सभापती अशोक पाटील यांनी स्पष्ट केले की, बाजार समितीचा कारभार चालवणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान वार्षिक सभेत करण्यात येईल.
या घोषणेने अमळनेर तालुक्यात शेतकरी समुदायात उत्साहाचे वातावरण निर्माण केले असून, अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करत स्थानिक विकासाची दिशा अधिक स्पष्ट झाली आहे.
