
साईमत, जामनेर : प्रतिनिधी
गेल्या पंधरा वर्षापासून येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. वाचनालयास पंधरा वर्षे उलटून गेल्यावरही शासनाकडून अद्यापपर्यंत कुठलेही अनुदान व निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे शासनाने त्याची त्वरित दखल घेऊन अनुदान प्राप्त करून द्यावे, अशी मागणी वाचनालयाचे संस्थापक-अध्यक्ष डी. डी. पाटील यांनी केली आहे.
गेल्या पंधरा वर्षापासून अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय हे पेन्शनर शिक्षक डी. डी. पाटील स्वखर्चाने चालवित आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन हे आमदार असताना त्यांच्या हस्ते गेल्या २ ऑक्टोबर २०१० रोजी वाचनालयाचे उद्घाटन झाले होते. दरवर्षी शासन मान्य ऑडिटरकडून वाचनालयाचे ऑडिट केले जाते. वाचनालयाचे पॅन कार्डही असून मंत्री ना.महाजन यांची शिफारस घेऊन मंत्रालयात शासन मान्यता मिळविण्यासाठी व अनुदान पात्र करण्यासाठी अनेकवेळा शासनाकडे प्रस्तावही पाठविण्यात आले आहे. मात्र, अद्यापपर्यंत वाचनालयास शासनाची मान्यता मिळालेली नाही. तसेच अनुदानही प्राप्त झालेले नाही. जामनेर शहरातील या वाचनालयानंतर स्थापन झालेल्या इतर वाचनालयाला शासनाने निधी दिला आहे. त्याचे पुरावेही मंत्र्यांकडे दिले आहे. असे असताना केवळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वाचनालय व ग्रंथालयास निधी का उपलब्ध करून दिला जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाचनालयाचे संस्थापक-अध्यक्ष डी. डी. पाटील हे पेन्शनर शिक्षक आहेत. तसेच साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांचे नाव मोठे आहे. साहित्य क्षेत्रात त्यांना गोडी असून ‘वाचाल तर वाचाल’ अशी त्यांची संकल्पना आहे. ही संकल्पना राबविण्यासाठी त्यांनी त्यांच्या पेन्शनमधून आतापर्यंत सुमारे चार लाख रुपये खर्च करून वाचनालयाचे पुस्तके आणून दिले आहेत. त्यामध्ये विद्यार्थी, गृहिणी, वृद्ध, तरुणांसाठी प्रत्येकाच्या जीवनात उपयोगी पडतील, असे पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून देऊन वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. विविध मासिके, दिवाळी अंक, सर्व दैनिक यांचा रोजचा खर्च डी. डी. पाटील हे आपल्या पेन्शनमधून करत आहे. दररोज शेकडो वाचक मोठ्या प्रमाणावर वाचनालयात येऊन पुस्तकांचा लाभ घेत असतात.
वाचनालय टिकणे काळाची गरज
आज मोबाईलचे युग आहे. सोशल मीडियामुळे वाचनाची गोडी कमी होत आहे. व्हॉट्सॲप, फेसबुकमुळे तरुण वर्ग वाम मार्गाला जाताना दिसत आहे. ही शोकांतिका असून आपल्या संस्कृतीचा तरुणांना विसर पडत आहे. म्हणून वाचनालय टिकणे ही आता काळाची गरज असल्याचे वाचनालयाचे अध्यक्ष डी. डी. पाटील म्हणाले. वाचनालयाची अधिक प्रगती व्हावी, म्हणून शासनाने तसेच मंत्री ना.गिरीष महाजन यांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन वाचनालयास त्वरित निधी उपलब्ध करून देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी आता वाचकांकडून जोर धरु लागली आहे.


