रावेरचे आ.शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला विश्वास
साईमत/न्यूज नेटवर्क/मुक्ताईनगर :
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल निर्माण झाल्यास स्थानिक ग्रामीण भागातच प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित होईल. भावी काळात नोकऱ्या मिळणे आणखी अवघड होणार असल्याने ॲग्रीकॉस विद्यार्थ्यांची इंडस्ट्री समाजाला पुढे नेऊ शकते, असा विश्वास रावेर विधानसभेचे आ.शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला. येथील शासकीय कृषी महाविद्यालयास त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कृषी शास्त्राचे शिक्षण उपजिविकेचे साधन आहे. म्हणूनच शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणात शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश केला आहे. ग्रामीण भागातील मनुष्यबळ शहराकडे न जाता गावांमध्येच टिकून ठेवले तर विकास साधता येईल, असेही ते म्हणाले.
पाल येथे मधुस्नेह संस्था परिवाराच्या सातपुडा विकास मंडळाच्यावतीने कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय अशी दोन महाविद्यालये पुढील शैक्षणिक वर्षात सुरु करण्यात येणार आहे. त्या धर्तीवर शासकीय कृषी महाविद्यालयाचा पॅटर्न आत्मसात करण्यासाठी संस्थेच्या विश्वस्तानी मुक्ताईनगर येथील शासकीय कृषी महाविद्यालयाला भेट घेऊन उपलब्ध साधन सामग्रीची पाहणी केली. वास्तुविशारद शिरीष बर्वे, दै.‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे, मधुस्नेह संस्था परिवाराचे कृषी व ग्रामविकास विभागाचे समन्वयक तथा ‘साईमत’चे वाणिज्य संपादक विवेक ठाकरे, पाल येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ महेश महाजन, प्रा.शरद वाणी, इंजि.राजू पटेल या सर्वांचे स्वागत महाविद्यालयाचे कृषी विद्या विभागाचे प्रमुख डॉ.अविनाश कोलगे यांनी केले.
आढाव्यासह प्रत्येक विभागाची दिली माहिती
यावेळी डॉ. प्रशांत नागे, डॉ. रमेश चौधरी, डॉ.आर. एस.शेख, डॉ. रंगनाथ बागुल, डॉ. बाळासाहेब रोमाडे, डॉ.मनिषा पालवे, डॉ. रवींद्र जाधव, डॉ. कुशल ढाके, डॉ. गणेश देशमुख यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून सर्व आढावा व प्रत्येक विभागाची माहिती दिली. यावेळी विवेक राऊत, विजय पाटील, माधुरी बेलसरे, अमोल टेलोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. तुषार भोसले तर आभार डॉ. सागर बंड यांनी मानले.