साईमत, जळगाव : प्रतिनिधी
महावितरणने तंत्रज्ञांच्या केलेल्या प्रशासकीय बदल्या ह्या नियमबाह्य असल्याने महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या कामगारांनी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात सोमवारी, १८ सप्टेंबर रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. मागील आंदोलनावेळी दिलेले आश्वासन पाळले न गेल्याने आता कामगारांनी पुन्हा एकदा धरणे धरले. आता बुधवारपासून कार्यालयीन वेळेत सलग तीन दिवस उपोषण केले जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी कामगारांनी घोषणाबाजी करून महावितरण प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला. आता बुधवारी, २० ते २२ सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत सलग तीन दिवस उपोषण केले जाणार असल्याचा इशाराही दिला आहे. त्यानंतर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले जाणार आहे. सोमवारच्या आंदोलनात विभागीय, सर्कल, झोन अशा तिघी कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासकीय बदल्या व विनंती बदल्यांसंदर्भात कंपनीचे निश्चित धोरण परिपत्रक ५१४ मध्ये नमूद आहे. मात्र या परिपत्रकाला महावितरण जळगाव विभागाने धाब्यावर ठेवले आहे. या परिपत्रकात बदल्यांबाबतचे मार्गदर्शन तत्त्वांचे उल्लंघन करून वरिष्ठ तंत्रज्ञ पदाच्या १५ कर्मचाऱ्यांचे आणि तंत्रज्ञ पदाच्या ४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या नियमबाह्य केलेल्या आहेत. प्रशासनाच्या मुजोर व मनमानी पद्धतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी मागील काळात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी ७ दिवसात मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते.
चौकशी समितीला दिलेली मुदत संपली
मुख्य अभियंता यांनी नेमलेल्या चौकशी समितीला दिलेली मुदत संपली आहे. धरणे आंदोलन स्थगित करुन जवळपास २ महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आलेला आहे. तरी सुधारीत बदली प्रक्रिया संबंधी विभागीय कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नाही. संघटनेने दिलेल्या नोटीशीची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्याच बरोबर नोटीशीच्या अनुषंगाने कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. केवळ वेळकाढू धोरण अवलंबिले जात आहे. मुजोर व आडमुठे धोरणामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढत असुन संघटनेला नाईलाजास्तव आंदोलनात्मक भुमिका घेण्यास प्रशासन भाग पाडत आहे. त्यामुळे विभागीय कार्यालया समोर स्थगित केलेले आंदोलन टप्प्या टप्प्याने अधिकाधिक तीव्र स्वरुपात सुरु झाले आहे.