आकाशवाणी सर्कल स्वच्छतेने उजळले, नागरिकांकडून स्वागत
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील प्रमुख आकाशवाणी सर्कल, इच्छा देवी चौक आणि अजिंठा चौफुली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड गवत, झुडपे व जंगली झाडे उगवून परिसर विद्रूप बनला होता. अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, संबंधित प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नव्हती. अशा निष्क्रियतेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (न्हाई) यांना निवेदन देत तातडीने साफसफाई करण्याची मागणी केली.
निवेदनात मनसेने स्पष्ट इशारा दिला होता की, आकाशवाणी चौक हा शहराचा चेहरा आहे. जर तीन दिवसात परिसर स्वच्छ केला नाही तर मनसे सर्कलमध्ये प्रतीकात्मक निषेध म्हणून बकऱ्या चारु, अशा कठोर इशाऱ्याची शहरभर चर्चा झाली. नागरिकांनीही मनसेच्या भूमिकेचे स्वागत करत, “अशा इशाऱ्यांनीच अधिकारी जागे होतात,” अशी प्रतिक्रिया दिली होती.
मनसेचा इशारा ठरला परिणामकारक
शेवटी मनसेचा इशारा कामी आला. सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी सकाळी प्रशासनाने तातडीने आकाशवाणी चौक परिसरात सफाई मोहीम सुरू केली. काही तासांतच गवतासह झुडपे काढून परिसर स्वच्छ आणि आकर्षक केला. प्रशासनाने मनसेच्या इशाऱ्याची तातडीने घेतल्याने कौतुक होत आहे. तसेच आकाशवाणी सर्कलवरील दिलेला मनसेचा इशारा परिणामकारक ठरला आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, दीपक राठोड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
